धर्माचे व्यावसायिकरण; लोकशाही आणि माणुसकीसाठी धोक्याची घंटा!
गेल्या दहा वर्षांत जुन्या धार्मिक संस्थां आणि मंदिरांना काही राजकीय पक्षांनी हायजॅक केले असून पिढ्यान पिढ्या चालत आलेली धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेली ठिकाणे आता राजकीय अजेंड्यांच्या प्रयोगशाळा झाल्या असून श्रद्धेच्या नावावर मतदारांचे ध्रुवीकरण, प्रचारासाठी धर्माचा वापर आणि विरोधकांना ‘धर्मद्रोही-राजद्रोही’ ठरविण्याची सवय वाढली आहे. सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव आणि माणुसकी ही मूल्ये, जी भारतीय संस्कृतीचा पाया आहेत, त्यांना या धार्मिक राजकारणाने तिलांजली दिली आहे का? असेच ठामपणे वाटते.
धर्म ही संकल्पना समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, धर्माच्या आड राजकीय अजेंडा राबवून समाजाचे विभाजन, नियंत्रण आणि नफा मिळविण्याचे साधन बनली आहे का? अशी शंका येते, धर्माचा पवित्र अर्थ हरवून, त्याच्या नावावर एक प्रचंड बाजार उभा राहिला असून या बाजारात उद्योगपतींपासून राजकारण्यांपर्यंत सर्वजण व्यापारी म्हणून उतरले आहेत. श्रद्धेच्या मंदिरात आता व्यवसायाचे फलक लावले गेले असल्याने भक्तीचे रुपांतर ब्रँडमध्ये झाले असल्याचेच म्हणावे लागेल!
धर्माच्या या बाजारात पैसा आणि सत्ता हेच देव बनले आहेत. मोठमोठे उद्योगपती आणि कॉर्पोरेट घराणी धार्मिक संस्थांना देणग्या देतात, पण या देणग्यांचा उद्देश आध्यात्मिकतेपेक्षा व्यवसायिक आणि राजकीय हित साधणे हा असतो का? असा प्रश्न पडतो. जसे मंदिरे, उत्सव मंडळे, यात्रा आणि संस्थांचा वापर त्यांच्या उत्पादनांची प्रसिद्धी आणि जनतेवर प्रभाव निर्माण करण्यासाठी केला जातो, या कारणांमुळे धर्मस्थळे ही समाजसेवेची केंद्रे राहिली नाहीत, तर ती राजकीय नफ्यासाठी काम करणारी मंडळे झाली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.
आज धर्माचा वापर फक्त लोकांना भक्त बनविण्यासाठी नाही, तर त्यांना विचारशून्य बनविण्यासाठी केला जात आहे. बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या सोडविण्याऐवजी तरुणांच्या हातात धर्माचे झेंडे देऊन त्यांना ‘रक्षणाच्या’ नावाखाली रस्त्यावर उतरवले जाते. सरकार आणि सत्ताधारी त्यांच्या समस्यांवर उत्तर देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांचे लक्ष अन्य दिशेला वळवले जाते. युवकाच्या हातात जर रोजगार असता, तर तो धर्माच्या नावावर नाही, तर विकासाच्या नावावर झेंडा धरला असता पण सत्तेच्या राजकारणाला ते नको आहे.
याच धर्माच्या आड आणखी एक धोकादायक खेळ खेळला जात आहे, तो म्हणजे शासकीय जमिनींचे आणि सार्वजनिक जागांचे लाटणे हे असून काही स्वयंघोषित धार्मिक संघटना शहरांच्या मध्यभागी असलेल्या मौल्यवान जमिनीं अतिक्रमण करून ‘धर्मकार्य’च्या नावाखाली हडप करत आहेत. “सेवा”च्या नावाखाली “संपत्ती” मिळविणे हा त्यांचा खरा हेतू असतो. या जागांवर स्थापन झालेल्या संस्थांमध्ये केवळ हितसंबंधी लोकांना सदस्य बनवून, पुढच्या सात पिढ्यांसाठी आपली सत्ता टिकवण्याची तयारी सुरू आहे. धर्म आणि समाजसेवेचा आभास निर्माण करून हा सत्तेचा, पैशाचा आणि मालमत्तेचा व्यवहार सुरु आहे.
या सगळ्या बाजाराचे मूळ कारण म्हणजे धर्माचे आणि श्रद्धेचे व्यवस्थापन धर्माचे व्यावसायिकरण करणाऱ्यांच्या हातात गेले असून धार्मिक ट्रस्ट आणि संस्थांमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव हे आहे. निधी कसा वापरला जातो, देणग्या कोणाकडून येतात, कोणाला पदे दिली जातात, यावर जनतेचा काहीच अधिकार नाही. संस्था समाजसेवेसाठी नव्हे, तर सत्तेच्या विस्तारासाठी चालवल्या जात आहेत. धर्माचा खरा संदेश “माणूस माणसाशी जोडला जावा” हा संदेश कालबाह्य झाला असून आता “माणूस माणसाशी भिडावा” अशा स्वरूपात बदलला आहे.
या परिस्थितीचा परिणाम म्हणून समाजात द्वेष वाढत आहे. प्रत्येक धार्मिक उत्सवाच्या मागे आता आर्थिक आणि राजकीय समीकरणे असतात. जेथे पूर्वी भक्ती होती, तेथे आता ब्रँड स्पर्धा आहे. जेथे एकत्र प्रार्थना होती, तेथे आता घोषणाबाजी आहे. जो धर्म एकेकाळी आत्मसंयम, सहानुभूती आणि माणुसकी शिकवत होता, तो आता अभिमान, हिंसा आणि असहिष्णुता शिकवत आहे.
मीडिया आणि प्रशासनाने या गोष्टींकडे डोळेझाक केली आहे. धर्माच्या नावावर होणारे भ्रष्ट व्यवहार, जमीन गैरव्यवहार, देणग्यांचा दुरुपयोग हे सर्व खुलेआम चालते, पण त्यावर आवाज उठवला की “धर्मविरोधी” ठरवले जाते. या भीतीच्या वातावरणामुळे नागरिक गप्प बसतात, आणि सत्ता यातून अधिक मजबूत होते.
या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे धर्माचा खरा अर्थ परत शोधणे हा असून धर्म म्हणजे सत्ता नाही, संस्था नाही, व्यवसाय नाही; धर्माचा खरा अर्थ माणुसकी, सहानुभूती, समानता आणि न्याय हा असून आपण धार्मिक असणे म्हणजे भक्तिपूर्ण असणे नव्हे, तर विवेकी असणे हे होय! विवेक, पारदर्शकता आणि जबाबदारी या तीन मूल्यांनी जर धर्माचे पुनरुज्जीवन झाले, तरच समाज पुन्हा एकत्र येईल.
धर्मसंस्थांच्या देणग्यांवर सार्वजनिक लेखापरीक्षण अनिवार्य केले पाहिजे. अतिक्रमण आणि जमीन लाटणे यावर कडक कारवाई केली पाहिजे. युवकांना धर्माच्या नावावर नव्हे, तर रोजगाराच्या नावावर एकत्र केले पाहिजे. शाळा आणि माध्यमांमधून सर्वधर्मसमभावाचे शिक्षण दिले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे धर्माच्या नावाने सत्ता मिळवणाऱ्यांना जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत.
आजचा सर्वात मोठा अन्याय म्हणजे श्रद्धेचा अपमान श्रद्धेच्या नावावरच होत आहे. मंदिरात घंटा वाजते, पण समाजात विवेकाचा आवाज हरवतो. देवाचा नामजप वाढतो, पण माणसाचे दुःख अनुत्तरित राहते. धर्म जर खरंच जनतेच्या कल्याणासाठी असता, तर बेरोजगार युवकाला नोकरी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला भाव, आणि गरीबाला न्याय मिळाला असता.
धर्माचा बाजार बंद करण्यासाठी भक्ती नव्हे, जागृती हवी आहे. जनतेने धर्मावर नव्हे, माणुसकीवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव मंदिरात नसतो, तो त्या हातात असतो, जे हात समाजासाठी काही निर्माण करतात, ज्या दिवशी जनता हे ओळखेल, त्या दिवशी धर्म अशा सत्तेच्या साखळीतून, पैशाच्या बाजारातून आणि कपटी राजकारण्यांच्या पंजातून कायमचा मुक्त होईल!
धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या या बाजारात सर्वांनी भक्त नव्हे, तर जागरुक नागरिक झाले पाहिजे, कारण जेव्हा माणुसकी धर्मापेक्षा मोठी ठरेल, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने भक्तिमय बनेल, आज खऱ्या अर्थाने धर्माला वाचवण्याची नाही, तर धर्माच्या नावावर चाललेल्या बाजाराला संपवण्याची गरज आहे.