पुणे: जिल्हा भूमी अभिलेख विभागात दीर्घकाळ सुरू असलेल्या गैरकारभारावर अखेर राज्य सरकारला कारवाई करावी लागली आहे. जिल्हा अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळताना गंभीर अनियमितता करणाऱ्या उपसंचालक सूर्यकांत मोरे यांना शुक्रवारी उशिरा महसूल विभागाने निलंबित केले.
मोरे यांच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. जबाबदारीची पदे भूषवूनही त्यांनी प्रशासकीय कामकाजाकडे सरळसरळ दुर्लक्ष केले. एकत्रीकरणाची असंख्य प्रकरणे प्रलंबित ठेवणे, मुदती संपल्यानंतरही काम न करणे या त्यांच्या कारभाराने विभागातील कामकाज ठप्प झाले.
या तक्रारींनंतर जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी चौकशीसाठी समिती नेमली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी सरिता नरके व उपसंचालक कमलेश हट्टेकर यांच्या समितीने मोरे यांचा गैरकारभार उघडकीस आणणारा अहवाल सरकारकडे सादर केला. या अहवालावर शिक्कामोर्तब करत महसूल विभागाच्या उपसचिव अश्विनी यमगर यांनी निलंबनाचे आदेश जारी केले.
या निर्णयामुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ माजली आहे. मोरे यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या प्रशासकीय ढिसाळपणाची आणि अकार्यक्षमतेची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली, हीच बाब विशेष मानली जात आहे.