MHADA Lottery Finally Scheduled After Months of delay

अखेर पुणे म्हाडा सोडतीला मुहूर्त मिळाला!

१० फेब्रुवारीला ४,१८६ घरांची ऑनलाईन लॉटरी

पुणे, दि.८:

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सप्टेंबर २०२५ मधील गृहनिर्माण सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता या बहुप्रतिक्षित ऑनलाईन सोडतीचा ड्रॉ काढण्यात येणार आहे. मा. शरदचंद्र पवार सभागृह, जिल्हा परिषद, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, त्यामुळे हजारो अर्जदारांच्या प्रतीक्षेला अखेर विराम मिळणार आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरांसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एकूण ४,१८६ सदनिकांचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्रातील २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३,३२२ सदनिका आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत.

या सोडतीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र असून, एकूण २,५८,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २,१५,९६५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून, त्यांचा सोडतीत समावेश करण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणी, ऑनलाईन प्रणालीतील त्रुटींमुळे अर्ज भरण्याच्या मुदतीस दोनदा वाढ देण्यात आली होती, तसेच अर्ज छाननी प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सोडत ही दीर्घकाळ रखडली होती.

आता १० फेब्रुवारीला ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रम मा. शिवाजी आढळराव पाटील, सभापती, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, तसेच मा. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.), उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, यांच्या दूरस्थ उपस्थितीत (व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) पार पडणार आहे.

या सोडतीच्या निमित्ताने सर्व अर्जदारांना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आलेल्या संदेशातील YouTube लिंकद्वारे ऑनलाईन सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अनेक अडथळे, विलंब आणि प्रतीक्षेनंतर अखेर सोडतीची तारीख निश्चित झाल्याने, घराच्या स्वप्नासाठी अर्ज केलेल्या हजारो कुटुंबांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!