विनापरवाना रासायनिक खत साठा जप्त : 4.61 लाखांचा साठा पकडला, गुन्हा दाखल
धाराशिव : वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले 456 पोते (सुमारे 20 मेट्रिक टन) रासायनिक खत जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत सुमारे 4.61 लाख रुपये असून, सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी मा. जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पुजार, मा. कृषि संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) श्री. सुनील बोरकर, मा. विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर श्री. साहेबराव दिवेकर आणि मा. मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रवींद्र माने आणि कृषी विकास अधिकारी श्री. प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथकाने ही धडक मोहीम राबवली. या कारवाईत विना परवाना खत साठा आढळून आल्याने वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद तालुका कृषी अधिकारी श्री. राजाराम बर्वे यांनी दाखल केली.
मोहीमेदरम्यान जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. डी. ए. गरगडे, प्रवीण पाटील, कृषी अधिकारी श्री. अविनाश माळी, विस्तार अधिकारी श्रीकांत साळवे, वाशी कार्यालयातील श्री. गायकवाड आणि श्री. साखरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, लातूर येथील तंत्र अधिकारी (गु.नि.) श्री. प्रवीण विठ्ठल भोर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या कारवाईमुळे बोगस खत विक्रेत्यांना मोठा इशारा देण्यात आला असून, शेतकऱ्यांनी अधिकृत परवाना धारकांकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.