जातनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांच्याकडूनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार

मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 – केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर स्वागत केले असून, हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होणार असून, विशेषतः सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी अधिक निधी देता येईल, असे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, “जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी अनेक संस्था, संघटना व व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीच्या आणि संवेदनशील नेतृत्वामुळेच ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे. अनुसुचित जाती आणि जमाती वगळता इतर समाजघटकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीची अचूक माहिती नसल्यामुळे योजनांचा लाभ योग्य ठिकाणी पोहोचत नव्हता. आता या जनगणनेमुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील.”

ते पुढे म्हणाले की, “जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे मागासवर्गीय समाजघटकांना अधिक निधी व संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकासात सर्वांचा सहभाग वाढेल आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय अधिक वेगाने गाठता येईल. हा निर्णय भविष्यात जातव्यवस्थाच संपूष्टात आणण्यास मदत करेल, असा माझा विश्वास आहे.”

या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!