पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आज (ता. 30) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढत त्यांची यवतमाळ येथील पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली केली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळातील गैरकारभाराची चौकशी सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विजयसिंह नलावडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील कुरुळी ग्रामपंचायतीतील कामकाजात समाजकल्याण विभागाचा निधी आणि ग्रामपंचायतीच्या 15% राखीव निधीतील कामांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात त्यांनी शासनाला खोटे व दिशाभूल करणारे अहवाल दिल्याचेही निदर्शनास आले.
या प्रकाराविरोधात भाजप आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष नितीन थोरात यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच प्रधान सचिवांकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या. शासनाने त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देत बदलीची कारवाई केली.
दरम्यान, नितीन थोरात यांनी उद्या (1 मे) महाराष्ट्रदिनी पुणे जिल्हा परिषदेसमोर ‘भीक मागो’ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच्या आदल्याच दिवशी नलावडे यांच्यावर ही कारवाई झाल्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नलावडे यांची बदली ही त्यांच्यावर आलेल्या आरोपांची गंभीरता आणि वाढता दबाव लक्षात घेऊन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र चौकशी कायम असल्याने ते अजूनही अडचणीत आहेत.