हवाई हल्ल्याचा सायरन, ब्लॅकआऊट, नागरी संरक्षण प्रशिक्षण; गृह मंत्रालयाचा आदेश
मुंबई, दि. ६ मे: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही या पार्श्वभूमीवर १६ महत्त्वाच्या ठिकाणी ही ड्रिल राबवली जाणार असून, राज्य सरकारने हायअलर्ट जारी केला आहे.
राज्यातील मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे ही मॉकड्रील होणार आहेत.
ड्रिलमध्ये कोणत्या बाबी तपासल्या जाणार?
या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जाणार असून, ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीचा सराव केला जाणार आहे. नागरी संरक्षण यंत्रणा, बंकर आणि खंदकांची स्वच्छता, त्यांची कार्यस्थिती, तसेच तातडीच्या वैद्यकीय आणि अन्नपुरवठ्याच्या यंत्रणांची तपासणी केली जाणार आहे.नागरिकांना या काळात काय करावे याचेही मार्गदर्शन केले जाईल. त्यात घरी औषधे, टॉर्च, मेणबत्त्या, अतिरिक्त पाण्याचा साठा, आणि रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. कारण आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्क आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात.
२४४ जिल्ह्यांत नागरी संरक्षण केंद्रांची तपासणी
केंद्रीय गृह मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, सायरन व्यवस्था, समन्वय यंत्रणा कार्यरत आहेत की नाही, याचे मूल्यमापन झाले. या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिलद्वारे वास्तविक संकटाला सामोरे जाण्याची सज्जता तपासली जाणार आहे.
सामान्य नागरिकांनाही दिले जाणार प्रशिक्षण
या मॉक ड्रिलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांनाही नागरी संरक्षणाबाबत प्रशिक्षित करणे हा आहे. युद्धजन्य किंवा दहशतवादी हल्ल्याच्या स्थितीत काय करावे, कुठे लपावे, घरातच सुरक्षित राहण्यासाठी कोणती तयारी ठेवावी, या सर्व बाबींचा सराव केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकार सतर्क; मंत्र्यांना आदेश
राज्यातील १६ ठिकाणी होणाऱ्या मॉक ड्रिलमुळे महाराष्ट्र सरकारनेही उच्च पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह सर्व यंत्रणांनी एकत्रित समन्वयाने काम करावे, अशी सूचना गृह विभागाकडून देण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत केवळ यंत्रणाच नव्हे, तर सामान्य नागरिकांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे मॉक ड्रिल दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता, यंत्रणांच्या सूचनांचे पालन करणे, सहकार्य करणे, व स्वसंरक्षणाच्या प्राथमिक उपाययोजना शिकणे ही काळाची गरज आहे.
मॉकड्रीलदरम्यान आवाज करणारे सायरन, वीज खंडित होणे, रस्त्यांवर पोलिस व आपत्कालीन यंत्रणा दिसणे या बाबी सामान्य आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहिती स्रोतांकडूनच अपडेट मिळवावेत.