पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताचा करारा वार! ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला.

जय हिंद! भारताची ‘सर्जिकल स्ट्राइक 2.0’; दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त…

नवी दिल्ली | 7 मे 2025: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतीय वायुसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली, आणि बहावलपूर परिसरात असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लक्ष्य करत कारवाई केली.

या धडक कारवाईने संपूर्ण देशात नवचैतन्य आणि समाधानाची भावना पसरली असून, हा हल्ला भारताच्या शौर्य आणि सामर्थ्याचं ठळक उदाहरण मानला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कठोर भाषेत सूचक इशारा दिला होता की, हा हल्ला निष्फळ जाणार नाही.

सैन्यप्रमुख, गुप्तचर यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यात सलग बैठकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अतिशय नियोजनबद्ध आणि अचूकरीत्या पार पडली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय वायूदलाने अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले, जिथून भारतात घातपात घडवून आणण्याचे नियोजन आणि आदेश दिले जात होते.

भारतीय लष्कराने अधिकृत ट्विटद्वारे ‘न्याय झाला. जय हिंद.’ असा संदेश दिल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण पसरलं. दुसरीकडे, एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या लष्करानेही हल्ल्याच्या घटनेची पुष्टी केली असून मुझफ्फराबाद, कोटली व बहावलपूरमधील ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले झाल्याचं मान्य केलं आहे.

भारताची ही कारवाई केवळ एक ‘बदला’ नाही, तर देशाच्या सुरक्षेचा आणि स्वाभिमानाचा ठोस संदेश आहे, की दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आता सुरक्षित आश्रय मिळणार नाही.ही कारवाई म्हणजे भारताच्या ‘नवीन सुरक्षा धोरणा’चा आरंभ असून, देशविरोधी कारवाया कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!