तंबाखूच्या मुखवट्याआडील फसवणूक उघड करुया!
पुणे, दि.१५: जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने दरवर्षी ३१ मे रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक तंबाखू नकार दिवस’ यंदा “आकर्षणाचा मुखवटा उतरवूया – तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करुया” या थीमसह साजरा होणार आहे. यंदाच्या थीमचा उद्देश तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती आणि प्रचारामागील वास्तव उघड करणे, तसेच या उद्योगांच्या फसवणूक करणाऱ्या रणनीतींबाबत जनतेला जागरूक करणे हा आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरात १ मे ते १५ जून २०२५ या कालावधीत ४५ दिवसांचे विशेष जनजागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत सामाजिक जनजागृती उपक्रम, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, ‘कोटपा कायदा २००३’ची प्रभावी अंमलबजावणी तसेच धूरमुक्त गाव आणि जिल्हा उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारच्या २००३ च्या कायद्याच्या अंमलबजावणीसह, १८ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या ई-सिगारेट बंदी अध्यादेशाचीही अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा आणि स्वतःसह आपल्या परिसरालाही तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
यासाठी पुढीलप्रमाणे शपथ घेण्यात येत आहे : “तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त रहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त तसेच ई-सिगारेटमुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करेन.”
या अभियानाच्या माध्यमातून तंबाखूविरोधी लढ्यास अधिक बळ मिळणार असून, समाजात सुदृढ आरोग्याची जाणीव निर्माण होणार आहे. “द्या तंबाखू व ई-सिगारेटला नकार, करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.