
नारायणगाव (जि. पुणे),दि.३: “शेतकऱ्यांच्या समृद्धीशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही,” असे स्पष्ट करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या सहाव्या दिवशी नारायणगाव (पुणे) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बनावट खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
कृषी विज्ञान केंद्र (KVK), नारायणगाव येथे आयोजित कार्यक्रमात चौहान यांनी कृषी शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे व त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. “16,000 कृषी शास्त्रज्ञ केवळ प्रयोगशाळेत बसून नव्हे, तर शेतात उतरून काम करतील तेव्हाच कृषी विकास शक्य आहे,” असे ते म्हणाले.केंद्रीय मंत्री यांनी यावेळी ‘टॉप पिक’ (टोमॅटो, कांदा, बटाटा) योजना अर्थात बाजार हस्तक्षेप योजना (MIS) विषद करताना सांगितले की, शेतकऱ्यांना अन्य राज्यात त्यांच्या शेतमालाला अधिक दर मिळत असल्यास, त्या मालाच्या वाहतुकीचा खर्च केंद्र सरकार उचलेल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांनाही योग्य दरात पिके उपलब्ध व्हावीत हा उद्देश आहे.
चौहान यांनी हवामान बदलाच्या संकटावर चिंता व्यक्त करत पिकांचे संरक्षण, योग्य खते व कीटकनाशकांचा वापर, तसेच टिकाऊ व प्रक्रियायोग्य पिके विकसित करण्यासाठी संशोधनाला गती देण्याचे निर्देश कृषी शास्त्रज्ञांना दिले. “टोमॅटो आणि द्राक्षांची टिकाऊ व निर्यातयोग्य जात विकसित करण्यावर भर द्यावा,” असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी किमान आधारभूत मूल्य, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे नुकसानभरपाई, वेळेवर बियाणे व अवजारे, शीतसाठवणूक व कृषी प्रक्रिया केंद्रांच्या कमतरतेसारख्या महत्त्वाच्या समस्या मांडल्या.
या प्रसंगी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनावणे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, केव्हीके प्रमुख अनिल मेहेर, आयसीएआर व अटारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.