Social Services or publicity stunts

समाजसेवेचा डिजिटल युगातील नवा चेहरा!

जनतेच्या अडचणींचा तमाशा, सोशल मीडियावरची स्टंटबाजी…

व्ह्यूज, फॉलोअर्स,कंटेंटच्या खेळात अडकलेली भंपक समाजसेवा!

(The Truth Behind the Frame.)

सत्यउपासक विशेष लेख:  आज एका शासकीय कार्यालयात कामानिमित्त जाण्याचा योग आला असता समाज माध्यमात परिचित असलेले जॅकेट, सूट-बूट परिधान केलेले एक महाशय समोर दिसले, एक सामान्य नागरिक आपली व्यथा त्यांना सांगत असताना ते नागरिकाला म्हणाले “तुमची अडचण केवळ तीन ते चार मिनिटात सांगा जेणेकरून मला रील बनवता येईल!” हे ऐकल्यानंतर प्रश्न पडला हे महाशय कंटेंट क्रिएटर की समाजसेवक?; असो अडचण ऐकल्यानंतर महाशय मोठ्या आवाजात “अधिकारी कुठे आहेत?” असा जाब विचारत आत शिरले. त्यांच्या बोलण्यात ना विषयाचा अभ्यास, ना समस्येचे गांभीर्य, ना संवादाची सभ्यता यापेक्षा आवाजात आक्रमकपणाच जास्त होता, मात्र मुद्द्यात खोली नव्हती; पुढे काही क्षणांतच मोबाईल कॅमेरा सुरू झाला आणि व्यक्तीच्या प्रश्नांपेक्षा “लाईव्ह” अधिक महत्त्वाचे असल्याचे दिसून आले.

हे सर्व पाहिल्यानंतर नकळत पूर्वीचे कॅमेऱ्यांऐवजी काखेत खांद्यावर अडकवलेली शबनमची पिशवी घेतलेले समाजसेवक आठवले, त्यांच्याकडे महागडे कॅमेरे, मायक्रोफोन किंवा ‘लाईव्ह’ची घाई नव्हती; तर चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आणि डोळ्यांत जनतेच्या प्रश्नांबद्दलची तळमळ होती; त्यांच्यामध्ये प्रत्येक समस्येचा सखोल अभ्यास करून कायद्याचे भान राखत प्रशासनाशी संयमाने संवाद साधण्याची नम्रता दिसायची, त्यांची समाजसेवा कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये नव्हे, तर जनतेच्या विश्वासात दिसून येत होती; प्रसिद्धीपेक्षा प्रश्नाचे निराकरण, व्ह्यूजपेक्षा न्याय आणि फॉलोअर्सपेक्षा लोकांचा आशीर्वाद हीच त्यांची खरी कमाई होती. संघर्ष हा त्यांच्यासाठी दिखावा नव्हता; तर तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. ते नागरिकाची अडचण समजून घेत, कागदपत्रांचा अभ्यास करत, कायद्याची बाजू तपासत आणि संबंधित अधिकाऱ्यांशी नम्र, संयमी व अभ्यासपूर्ण संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत. प्रसिद्धी हा त्यांचा उद्देश नव्हता; प्रश्नाचे निराकरण हाच त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता.

परंतु आज मात्र समाजसेवेचे चित्र पूर्णपणे बदलले असून अनेक ठिकाणी अभ्यासापेक्षा आक्रमक अभिनय, संवादापेक्षा आरडाओरडा, आणि समाधानापेक्षा सोशल मीडियासाठी दोन मिनिटांचा ‘व्हायरल कंटेंट’ अधिक महत्त्वाचा झाल्याचे दिसते. प्रश्न सुटतो की नाही, संबंधित नागरिकाला न्याय मिळतो की नाही, यापेक्षा व्हिडिओला किती व्ह्यूज, किती लाईक्स आणि किती फॉलोअर्स मिळाले, यालाच जणू यशाचे मापदंड मानले जात आहेत.

आज समाज माध्यमं उघडली की, स्क्रीनवर दिसतात ते मोठे इन्फ्लुएंसर, युट्युबर, आणि स्वतःला “समाजसेवक” म्हणवणारे काही लोक, कुणाच्या अडचणीचे थेट प्रसारण, शासकीय अधिकाऱ्यांवर उघडपणे ओरड, आणि “मीच न्याय देतो” असा अभिनय! ही आहे सध्या सुरू असलेली “डिजिटल समाजसेवेची” कार्यशैली!हे पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो, हे सर्व डिजिटल समाजसेवेचा मुखवटा पांघरून केवळ कंटेंटसाठी रंगवलेले समाजसेवेचे नाटक तर नाही ना? समाजसेवा खरोखर बदलली आहे, की समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी, व्ह्यूज, फॉलोअर्स आणि वैयक्तिक स्वार्थाचा नवा उद्योग उभा राहिला आहे?

आजचे डिजिटल समाजसेवक नागरिकाची खरी समस्या सोडवण्याऐवजी, जनतेच्या वेदना व्हिडिओच्या कंटेंटमध्ये बदलून त्यांच्या अडचणींना हवेत सोडून देऊन केवळ प्रसिद्धीतून मिळणाऱ्या व्ह्यूज लाइक्सवर लक्ष केंद्रित करताना दिसतात; कन्टेन्ट आणि समाज माध्यमातील व्ह्यूज करता अर्धवट कायद्याच्या ज्ञानाबरोबरच लोकशाही स्वातंत्र्य यांची तोतरी मोठ्या आवाजातील वक्तव्य करून सोशल मीडियाच्या लाईव्हद्वारे लोकांना भुलवून ठेवत असून जेव्हा रस्त्यावर उतरायची वेळ येते तेव्हा साथ देण्याऐवजी मात्र अदृश्य होतात.

असे अहो रात्र जनतेच्या वेदनांचा तमाशा करून समाजसेवेचा केवळ आव आणून फक्त व्ह्यूज, फॉलोअर्स, सबस्क्राईबर्स, कंटेंटच्या खेळातून नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे दलालच म्हणावे लागेल! 

डिजिटल युगातील समाजसेवकांची कार्यपद्धती:

अडचणीतील नागरिकाला “तुमची कहाणी माझ्या चैनलवर मांडा, मी लगेच अधिकाऱ्यांना विचारणा करतो.” असे सांगून विषयाचे गांभीर्य आणि परिस्थितीची जाण न ठेवता, त्या नागरिकाच्या समस्येवर विचार न करता त्यांनी थेट संबंधित शासकीय अधिकाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून “आता तुमच्या अन्यायाचा निकाल मी देतो” अशा थाटात न्याय मिळवून देतो म्हणणारे प्रत्यक्षात मात्र संबंधित नागरिकाला बाहेर थांबवून, अधिकाऱ्यांसोबत केबिनमध्ये स्व:हितगुज साधून कमिशन ने आपली झोळी भरतात, विशेष म्हणजे अशा  कायद्याच्या अर्धवट ज्ञानाने मिरवणाऱ्या, सोशल मीडियाच्या आभासी प्रसिद्धीच्या नादाने समाजसेवेचे मुखवटे पांघरणाऱ्यांमुळे जनतेच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतात, फक्त संविधान, लोकशाही, आणि सोशल मीडियाच्या नावाखाली स्वतःला सर्वज्ञ समजून कुणावरही आरोप-प्रत्यारोप करणे, बदनामी करणे आणि एजंटगिरी करून स्वतःचा स्वार्थ साधणे हाच त्यांचा उद्देश असतो.

नागरिकांनो, अशा खोट्या “डिजिटल युगातील बनावटी समाजभूषणां “च्या हातचे खेळणे बनू नका. कायद्याने मिळणारे संविधानिक हक्क आणि नागरी कर्तव्ये हीच प्रत्येकाची खरी ताकद आहे. योग्य मार्गाने, कायदेशीर पद्धतीने, आपली अडचण सुटू शकते!

याकरिता सर्वसामान्यांनी हेही लक्षात घ्यावे की; या युट्युबरने आतापर्यंत समाजासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून किती आंदोलन केली?

या स्वयंमघोषित डिजिटल तारणहारांनी जनतेसाठी किमान एक दिवस तरी उपोषणाची कणखरता दाखवली आहे का, अथवा एकदा तरी रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात छाती ठोकून लढले आहेत का; की फक्त मोबाईलचा कॅमेरा ऑन झाला की ह्यांची ‘समाजसेवा’ सुरू होते आणि लाईव्ह संपला की त्यांचा लढा देखील संपतो? असे तर नाही ना!

यांच्या राहणीमानात, स्वभावात, आणि कृतीत समाजसेवकाचा कणभर तरी अंश आहे का? की फक्त भंपकबाजी, दिखाऊपणा, आणि सोशल मीडियाच्या चकचकीत प्रसिद्धीतून जनतेला मूर्ख बनवणे हाच त्यांचा मुख्य धंदा आहे?

या प्रश्नांची उत्तरे शोधल्याशिवाय अशा व्यक्तींच्या मागे जाऊन कुणाच्यातरी हातचे खेळणे होऊ नये.

शेवटी खरी समाजसेवा सोशल मीडियावरच्या नाटकांतून होत नाही, तर ती रस्त्यावर, कायद्याच्या चौकटीत, आणि नागरिकांच्या खऱ्या लढ्यातूनच होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!