महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी
शाश्वत शेती दिनाच्या संकल्पनेतून महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी शासन व एम.एस. स्वामिनाथन फाउंडेशन एकत्र…
मुंबई, दि. २३ :
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर आधारित चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. प्रा. एम.एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जन्मदिवसाला कृषी विभागाने ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून घोषित केले आहे. शाश्वत शेती, पोषण सुरक्षा तसेच महिला व पुरुष यांच्यातील शेतीतील समानता बळकट करण्यासाठी शासनाने एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला असून या कराराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत
“महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत,” असे प्रतिपादन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले.
या चर्चासत्रात एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन, महिला शेतकरी प्रतिनिधी, राज्यातील विविध भागांत महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलास पगारे, उमेद–राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, विधी व न्याय विभागाचे संयुक्त सचिव मकरंद कुलकर्णी तसेच महिला किसान अधिकार मंचच्या सीमा कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले.
“महिला शेतकऱ्यांची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून शासनस्तरावर त्यांना आवश्यक पाठबळ दिले जात आहे,” असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी नमूद केले. हवामान बदलामुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या अडचणी, संरचनात्मक अडथळे आणि त्यावरील उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बीड येथील द्वारकाताई वाघमारे, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील वैशाली घुगे तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शांताबाई वारवे यांनी दैनंदिन शेतीतील अडचणी, शासनाकडून अपेक्षित उपाययोजना आणि अनुभव कथन केले.
विदी लीगल सेंटर व एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकऱ्यांच्या स्थानिक पातळीवरील आव्हाने तसेच संभाव्य धोरणात्मक व कार्यक्रमात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. महिला शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याबाबतही यावेळी मंथन करण्यात आले.
भरड धान्य पिकांवर विशेष भर
एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे जैवविविधता संचालक डॉ. ई. डी. इस्रायल ऑलिव्हर किंग यांनी भरड धान्य पिकांच्या संवर्धनातील आव्हाने, गरजा आणि भविष्यातील संधी यावर सादरीकरण केले. ओडिशा मिलेट मिशनच्या अनुभवांचे सादरीकरण करताना राज्यस्तरीय मिलेट उपक्रम यशस्वीपणे कसे राबवता येतात, याची माहिती देण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत एनएआरपी, कोल्हापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. एस. जी. पवार तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एस. इंगोले यांनी संशोधन, बियाणे विकास व क्षेत्रीय अंमलबजावणीतील अनुभव मांडले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मांडताना आयआयएमआर, हैदराबादच्या संचालक डॉ. तारा सत्यवती, बाजरी ब्रीडर डॉ. पी. संजना रेड्डी, आयसीआरआयएसएटीच्या जीन बँकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वेत्रिवेंद्रन मणी तसेच ओडिशा मिलेट मिशनचे माजी अँकर दिनेश बालम यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रामुळे महाराष्ट्रात भरड धान्य पिकांवर आधारित शाश्वत शेतीसाठी धोरणात्मक उपाययोजना प्रणाली उभारण्यास ठोस दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.