फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू
एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चारही जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा
सत्यउपासक/ फलटण: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव (साखरवाडी) येथे मंगळवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५) हे घरातील बल्ब काढत किंवा लावत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी पत्नी गंगू सतीश शिंदे (वय ४०), मुलगा सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि सून आरती सतीश शिंदे (वय २४) यांनी धाव घेतली. मात्र, एकामागून एक चौघांनाही विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेतील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – १) सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय ४५)
२) गंगू सतीश शिंदे (वय ४०)
३) सचिन सतीश शिंदे (वय २६)
४) आरती सतीश शिंदे (वय २४)
सर्व मृत हे साखरवाडी, खामगाव (ता. फलटण) येथील रहिवासी असून, एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि विजेचा धक्का कशामुळे बसला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.