Three Warkaris Lives Lost in Jejuri Road Accident

जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात भीषण अपघात; भरधाव ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी!

सत्यउपासक/ जेजुरी: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ असताना जेजुरीजवळ सासवड-जेजुरी मार्गावर (बेलसर टोलनाक्याजवळ) सोमवारी (१३ जुलै) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक नांदेड येथील असून तो नियंत्रण सुटल्याने थेट दिंडीत घुसला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक, वारकरी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात हलविले.

प्राथमिक तपासात ट्रकचालकाने तापाच्या गोळ्या घेतल्याने त्याला ग्लानी आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. चालकाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली असून वारकरी संप्रदायातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. राज्यातील विविध मान्यवरांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत जखमींना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!