Palkhi Arrival Roads, Routes & Restrictions

पालखी आगमनामुळे ९ जुलैला पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; अंतर्गत हलक्या वाहनांसाठी निर्बंध!

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…

सत्यउपासक/ पुणे: संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात आगमन होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पालखी मार्गावरील अनेक रस्त्यांवर सकाळपासून वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध असणार आहेत.

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून वडमुखवाडी, चऱ्होली फाटा, दिघी, बोपखेल फाटा, विश्रांतवाडी, फुलेनगर, संगमवाडी, एफ.सी. रोड, लक्ष्मी रोड, बुधवार चौक, नाना पेठ मार्गे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी पोहोचणार आहे.

यामुळे पहाटे ३.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत (आवश्यकतेनुसार) बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी चौक आणि पालखी मार्गावरील विविध रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी धानोरी रोड तसेच इतर पर्यायी अंतर्गत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय होळकर पूल–चंद्रमा चौक, शादलबाबा दर्गा–पाटील इस्टेट, इंजिनिअरिंग कॉलेज चौक–आरटीओ तसेच इतर काही मार्गांवर पहाटेपासून रात्रीपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीवर निर्बंध राहतील.

संत श्री तुकाराम महाराज पालखीचा मार्ग पिंपरी, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस पूल, मरिआई गेट, वाकडेवाडी, पाटील इस्टेट, इंजिनिअरिंग कॉलेज चौक, सिमला ऑफिस चौक, एफ.सी. रोड, गरवारे पूल, लकडी पूल, सेवासदन चौक, लक्ष्मी रोड, बुधवार चौक, सोन्या मारुती चौक, नाना पेठ मार्गे निवडुंग्या विठोबा मंदिर असा राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून बोपोडी, खडकी, औंध, ब्रेमेन चौक, भाऊ पाटील रोड, पर्णकुटी चौक, होळकर पूल–साप्रस चौकी, बंडगार्डन पूल, गांधी उद्यान चौक, तारकेश्वर चौक, गुंजन चौक, एअरपोर्ट रोड तसेच आरटीओ चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात, तर संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठ येथील निवडुंग्या विठोबा मंदिरात दि. ९ जुलै २०२६ रोजी मुक्कामी असणार आहे. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवरही वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते तुकाराम पादुका चौक
सकाळी ८.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत रेंजहिल चौक–संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), खंडोजीबाबा चौक–वीर चाफेकर चौक (फर्ग्युसन रस्ता) तसेच गाडगीळ पुतळा–स. गो. बर्वे चौक (शिवाजी रस्ता) हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. या काळात रेंजहिल–सेनापती बापट रस्ता–नळस्टॉप, खंडोजीबाबा चौक–कर्वे रस्ता–सेनापती बापट रस्ता तसेच गाडगीळ पुतळा–कुंभारवेस चौक–आरटीओ चौक–जहांगीर रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल.
तुकाराम पादुका चौक ते बेलबाग चौक
दुपारी १२.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार फर्ग्युसन रस्ता ते टिळक रस्ता, डेक्कन परिसर, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता तसेच बेलबाग चौक परिसरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. वाहनचालकांनी सेनापती बापट रस्ता–नळस्टॉप–म्हात्रे पूल, शास्त्री रस्ता–सेनादत्त चौकी–म्हात्रे पूल–नळस्टॉप तसेच इतर सूचित पर्यायी मार्गांचा वापर करावा.
बेलबाग चौक ते निवडुंगा विठोबा मंदिर / पालखी विठोबा मंदिर
दुपारी २.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, सेवासदन चौक, शिवाजी रस्ता आणि संबंधित परिसरातील मार्गांवर आवश्यकतेनुसार वाहतूक बंद करण्यात येईल. या कालावधीत बेलबाग चौक–रामेश्वर चौक–शनिपार चौक–बाजीराव रस्ता तसेच फुटका बुरूज–गाडगीळ पुतळा–कुंभारवेस आणि जिजामाता चौक–फडके हौद–नेहरू रस्ता, संत कबीर चौक-रास्ता पेठ चौक-सेव्हन लव्हज् या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारी २ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार देवजीबाबा चौक–हमजेखान चौक, सोमवार पेठ पोलीस चौकी–डुल्या मारुती चौक आणि रामोशी गेट–पालखी विठोबा मंदिर–संत कबीर चौक–चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील. या मार्गांवरील वाहनांनी गणेश रोड, फडके हौद चौक आणि नेहरू रोड या पर्यायी मार्गांचा वापर करावा.
याशिवाय स. गो. बर्वे चौक ते स्वारगेट (शिवाजी रोड) तसेच संत कबीर चौक ते बेलबाग चौक (लक्ष्मी रोड) हे मार्गही बंद राहतील. संबंधित वाहनांसाठी जे. एम. रोड–खंडोजीबाबा चौक–टिळक चौक–टिळक रोड आणि नेहरू रोड हे पर्यायी मार्ग उपलब्ध असतील.

पालखी मुक्कामाच्या काळात मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक दगडूशेठ गणपती मंदिर, सारसबाग आणि शनिवारवाडा येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहतुकीवर विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

भाविकांच्या वाहनांसाठी शहरातील विविध भागांनुसार स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, पालखी मुक्काम परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी निर्धारित पार्किंगचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना आणि छेदणाऱ्या उपरस्त्यांवर १०० मीटरपर्यंत कोणतेही वाहन उभे करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. पालखी पुढे सरकताच संबंधित रस्त्यांवरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.

संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार असल्याने या परिसरात विशेष वाहतूक निर्बंध लागू राहतील. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी विठोबा चौक ते बाबासाहेब किराड पथ जंक्शन तसेच अरुणा चौक ते पारशी अगेरीया रस्ता या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय टिळक चौक–बेलबाग चौक (लक्ष्मी रोड) आणि वीर चाफेकर चौक–खंडोजी बाबा चौक (फर्ग्युसन रोड) या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे निर्बंध आवश्यकतेनुसार शिथिल करण्यात येणार असून या संपूर्ण मार्गावर ‘नो पार्किंग झोन’ लागू राहणार आहे.

पेट्रोल-डिझेल टँकर वाहतुकीबाबत ९ जुलै रोजी जुना पुणे–मुंबई महामार्ग व आळंदी रोड परिसर, १० जुलै रोजी भवानी पेठ, नाना पेठ व रास्ता पेठ भागात परवानगीनेच प्रवेश, तर ११ जुलै रोजी सोलापूर महामार्गावर टँकर वाहतूक बंद राहणार आहे.

पालखीच्या दिंड्यांसोबत येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. ९ जुलै रोजी आळंदी–विश्रांतवाडी मार्गावरील वाहनांनी आळंदी–मरकळ–तुळापूर–फुलगाव–लोणीकंद–वाघोली–लोहगाव–येरवडा मार्गाचा वापर करावा. तसेच इंदिरानगर–दत्तमंदिर ते मरिआई गेट जाणाऱ्या वाहनांनी साप्रस चौकी जंक्शन–चंद्रमा चौक–सादलबाबा दर्गा–पर्णकुटी चौक मार्गाचा वापर करावा.

११ जुलै रोजी पुण्याकडून सासवडकडे जाणाऱ्या वाहनांनी भैरोबानाला चौक–लुल्लानगर चौक–कोंढवा–खडी मशीन चौक–बोपदेव घाट मार्गे सासवडकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षाशी ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!