Dahi Handi our culture or just entertainment

दहीहंडीचा जल्लोष की संस्कृतीचा ऱ्हास?

जल्लोष, प्रसिद्धी आणि मनोरंजनाच्या गर्दीत परंपरेचा आत्मा हरवतोय का?

सत्यउपासक विशेष लेख: गोविंदा आला रे आला…’ या जयघोषात महाराष्ट्राच्या दहीहंडीची खरी ओळख दडलेली असून गावागावातील गोपाळ मंडळे, तालुक्या-तालुक्यातून येणारे गोविंदा, एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून दहीहंडी फोडण्यासाठी घेतलेली मेहनत, संघभावना, साहस, शिस्त आणि श्रीकृष्णाच्या बाललीलांशी जोडलेली परंपरा हा दहीहंडी उत्सवाचा आत्मा आहे. 

आज दहीहंडीला क्रीडा स्वरूप प्राप्त झाले असून गोविंदांना विमा संरक्षणासह विविध सुविधा दिल्या जात आहेत; राज्यात दहीहंडीला क्रीडा मान्यता मिळाली असून त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागनेही दहीहंडीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा असल्याचे मान्य केले असून ही अभिमानाची बाब आहे. परंतु केवळ क्रीडा मान्यता मिळाल्याने त्यातील सांस्कृतिक जबाबदारी संपत नाही, उलट ती वाढते. गोविंदांच्या थरांमध्ये शिस्त आहे, जोखीम स्वीकारण्याचे धैर्य आहे, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची भावना आहे आणि ‘मी’पेक्षा ‘आपण’ मोठे असल्याचा संदेश आहे, खरे तर याच मूल्यांचा उत्सव आपण साजरा करायला हवा!

गोविंदा आला रे आला…हा जयघोष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना त्याच्यासोबत संस्कार, संस्कृती, शिस्त आणि महाराष्ट्राच्या मातीचा सुगंधही पोहोचला पाहिजे, सोबतच या उत्सवाचे मूळ स्वरूप, त्यातील संस्कार आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारी मूल्ये जपण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, मात्र सद्यस्थिती पाहता पुढील प्रश्न पडतात; जल्लोष, प्रसिद्धी आणि मनोरंजनाच्या गर्दीत परंपरेचा आत्मा हरवतोय का? पुढच्या पिढीसमोर आपण कोणता आदर्श ठेवत आहोत? दहीहंडी म्हणजे केवळ डीजे, नृत्य आणि गर्दी नाही! उत्सव असावा, जल्लोष असावा, नृत्य असावे, संगीत असावे; पण त्या सगळ्याला संस्कृतीची चौकट असावी. लोककला सादर होत असेल, पारंपरिक नृत्य होत असेल, महाराष्ट्राच्या कलावैभवाचे दर्शन घडत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण दहीहंडीच्या नावाखाली काही ठिकाणी केवळ गर्दी खेचण्यासाठी अंगविक्षेप करणारे, अंगप्रदर्शनाला प्राधान्य देणारे किंवा लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांसमोर आक्षेपार्ह ठरू शकतील असे नृत्यप्रकार सादर केले जात असतील, तर त्याकडे केवळ ‘मनोरंजन’ म्हणून डोळेझाक करणे योग्य आहे का?

उत्सव साजरा करण्याचा अधिकार असला तरी तो इतर नागरिकांच्या शांततेच्या आणि आरोग्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा नसावा. त्यामुळे आयोजकांनी डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवत रात्री १० वाजण्यापूर्वी ध्वनिक्षेपकाचा वापर बंद करणे आवश्यक आहे. दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा जल्लोष आणि पारंपरिक आनंद कायम ठेवतानाच ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे, मानवी जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अल्पवयीन मुलांचे संरक्षण करणे आणि सार्वजनिक शिस्त राखणे यांना सर्वोच्च प्राधान्य देणे हीदेखील आयोजकांची सामाजिक जबाबदारी आहे.

दहीहंडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, पोवाडे, भारूड, अभंग, कीर्तन, पारंपरिक वाद्ये, मर्दानी खेळ, लोकनृत्य, कृष्णलीला, सामाजिक संदेश देणारे प्रयोग, शेतकरी आणि सैनिकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी असे कितीतरी कार्यक्रम घेता येऊ शकतात. पुण्यात यंदा काही मंडळांनी डीजेमुक्त दहीहंडी आयोजित करून ढोल-ताशे, हलगी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य दिल्याचेही समोर आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!