“जलतारा : शेतीसाठी पाण्याचा शाश्वत आधार”
पावसावर अवलंबून असलेली महाराष्ट्रातील शेती अनेकदा पावसाच्या अनियमिततेमुळे अडचणीत येते. काही वेळा पाऊस भरपूर पडतो, परंतु पावसाचे सर्व पाणी वाहून जाते आणि जमिनीला किंवा भूगर्भातील जलसाठ्याला त्याचा फारसा उपयोग होत नाही. परिणामी, थोड्याच काळात पाण्याची टंचाई भासू लागते. यावर उपाय म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत “जलतारा” ही संकल्पना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
जलतारा म्हणजे काय?
जलतारा म्हणजे आपल्या शेतातच नैसर्गिकरित्या पाणी साठवून ते जमिनीत झिरपवण्याची एक साधी पण प्रभावी पद्धत. पावसाचे पाणी वाहून न जाता ते आपल्या शेतातच जिरवण्यासाठी जलतारा उपयोगी ठरते. शेतातील ज्या जागी पाणी साचते, अशा ठिकाणी 5 फूट लांबी, 5 फूट रुंदी आणि 6 फूट खोलीचा खड्डा खोदून त्यात 80 मिमी व 100 मिमी आकाराचे मोठ्या दगडांचे भराव केले जातात. या जलताऱ्यामुळे जमिनीत पाणी मुरते आणि भूजल साठा वाढतो. डोंगरी भागात अशा जलताऱ्याची अंदाजे किंमत 5264 रुपये असून 17 मनुष्य दिन निर्माण होतात, तर मैदानी भागात हा खर्च 4643 रुपये असून 15 मनुष्य दिनांची कामे होतात.
जलताऱ्याचे फायदे आणि परिणाम
एक जलतारा खड्डा चार महिन्यांत सुमारे 3.6 लाख लिटर पाणी जमिनीत मुरवतो. पावसाचे 35 टक्के पाणी वाहून जाते, पण जलताऱ्यामुळे हेच पाणी अडवून जमिनीत झिरपवले जाते. परिणामी, शेतातील विहिरीची पाणीपातळी टिकून राहते आणि सिंचनासाठी आवश्यक पाणी दीर्घकाळ मिळू शकते. यामुळे उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना पाणीपुरवठा शक्य होतो.अतिवृष्टी झाल्यास पाणी शेतात साचून पीक कुजण्याचा धोका असतो, पण जलताऱ्यामुळे हे पाणी सहज झिरपते. त्यामुळे शेत चिबड होत नाही, उत्पादनक्षमता वाढते आणि शेतीचे नुकसान टळते.
रोजगार निर्मितीसह शेतीस आधार
मनरेगा अंतर्गत जलतारा बांधकामामुळे केवळ पाणी साठवण होत नाही, तर स्थानिक युवकांना कामाची संधी मिळते. म्हणजेच हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. “जलतारा” ही एक अशी योजना आहे, जी शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था तर करतेच, पण त्याचबरोबर सध्या रोजगाराची गरज असलेल्या गावकऱ्यांना कामही देते.
जलतारा ही संकल्पना केवळ पावसाच्या पाण्याचा वापर करण्याचे माध्यम नाही, तर ती आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आहे. “थेंब थेंब साचत जातो, मग तो महासागर होतो” हे लक्षात घेऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एक तरी जलतारा निर्माण करावा. कारण, हा एक छोटासा खड्डा नसून तो आहे आपल्या शेतीच्या समृद्धीचा पाया.
“पाणी साठवा – शेती वाचवा, जलतारा करा – निसर्गाशी नातं जोडा!”