डिजीटल स्वाक्षरीची खात्री केल्याशिवाय म्हाडाच्या सदनिकेचा करारबद्ध व्यवहार करू नका – पुणे म्हाडाचा इशारा

डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन

पुणे, दि.३०: गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा), पुणे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उपमुख्य अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा न करता कोणत्याही व्यक्तीसोबत सदनिकेचा विक्री करार करू नये. अन्यथा संबंधित विकासक व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०२३ पूर्वीच्या सर्व सोडतींतील १५% सामाजिक गृहनिर्माण व २०% सर्वसमावेशक योजनेतील उर्वरित सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर पात्र व गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रक्रियेसाठी कोणतीही एजन्सी किंवा मध्यस्थ नेमलेले नाहीत. नागरिकांनी कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नये, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

उपमुख्य अधिकारी अतुल खोडे यांनी स्पष्ट केले की ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असून, देकार पत्र लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपमुख्य अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून दिले जाते. कोणतेही देकार पत्र मानवी स्वाक्षरी अथवा रबरी शिक्क्याद्वारे देण्यात येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!