
मान्सूनची गती मंदावणार?; पेरणीची घाई टाळा!
राज्यात यंदा मान्सूनने २५ मे रोजी, म्हणजे अपेक्षेपेक्षा दहा दिवस आधीच दक्षिण कोकणात हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकरी बंधूंनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, “पावसावर पोसली जाते शेतकऱ्याची आशा आणि चिंता दोन्ही”, याप्रमाणे अनेकांच्या मनात आशेचे अंकुर उमलले असले तरीही हवामान खात्याच्या अलीकडील अंदाजानुसार २७ मेनंतर मान्सूनचा प्रवास थांबण्याची शक्यता असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहणार आहे, या अलीकडील इशाऱ्याने पुन्हा अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत, या सोबतच शेतीतज्ञांचे ही स्पष्टपणे म्हणणे आहे की, “पावसाचं खरं रूप अजून यायचंय थांबा, विचार करा!” कारण, “पावसाचा पहिला थेंब म्हणजे पेरणीची वेळ नव्हे!”
विशेषतः कोरडवाहू भागांतील शेतकऱ्यांनी यंदा अधिक सावध राहण्याची गरज आहे. काही ठिकाणी पडलेल्या सुरुवातीच्या वादळी पावसामुळे “आभाळ आलं म्हणून बी पेरू नका!” हा सल्ला फार महत्त्वाचा ठरतो. मान्सून लवकर दाखल झाला असला तरी खरे पावसाळी दिवस काहीसे लांब आहेत. कोकणासारख्या भागांमध्ये काहीशी नियमितता असली तरी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू भागांमध्ये खऱ्या अर्थाने पेरणीसाठी आवश्यक असा सातत्यपूर्ण पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत “फक्त ढग पाहून नांगर चालवणं म्हणजे मेहनतीवर पाणी फिरवणं!”
शेती हे नुसते कष्टाचे नव्हे, तर संयमाचे, दूरदृष्टीचे आणि अनुभवाचे काम आहे. यशस्वी शेतकरी तोच जो “चार वेळा मापून एकदा चिरेवर घाव घालतो”. याचा अर्थ असा की पेरणीसारखा महत्त्वाचा निर्णय घाईघाईने न घेता, हवामान, पाणी उपलब्धता, जमिनीतील ओलावा आणि इतर घटक विचारात घेऊनच घेणे आवश्यक आहे. अलीकडच्या काही वर्षांत हवामानातील चक्र बिघडल्यामुळे “आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या सोशल मीडियावरून अनेकदा भ्रामक माहिती पसरवली जाते, ‘मान्सून पोहोचला’, ‘तयारी करा’, ‘लगेच पेरणी करा’ अशा बातम्यांचा मारा सुरू होतो. पण “दुधाने पोळलेला ताक ही फुंकर घालून पितो”, हे शहाणपण आता शेतीत अधिक महत्त्वाच झालं आहे. आजच्या अघोषित हवामान संकटाच्या काळात कोणतीही घाई भविष्यासाठी संकटाचे बीज ठरू शकते. म्हणूनच “थांबावे तेथे थांबावे, चालावे तेथेच चालावे” हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, अन्यथा आज घाई केली, आणि पेरलेले बियाणे वाया गेले, तर त्याचे नुकसान फक्त आर्थिकच नसेल, तर शेतकऱ्याच्या मनोबलाचेही होईल. या अपयशाचे सावट पुढील संपूर्ण हंगामभर असते, आणि “हाती आले opportunity, पण पाऊस घेऊन गेला immunity” अशी विडंबनात्मक परिस्थिती तयार होते.
या पार्श्वभूमीवर, “घाईगडबडीत केलेली शेती, उन्हात वाळलेली भाकरी” हे वास्तव टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने संयम बाळगावा. आधुनिक शेतीत शाश्वततेसाठी केवळ कष्ट नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनही आवश्यक आहे. हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवून, स्थानिक कृषी अधिकारी, विज्ञान केंद्रे, आणि शेतकरी संघटनांशी संवाद साधूनच निर्णय घ्यावेत.
शेवटी, “शेतात काम करावे पण आभाळाकडे लक्ष ठेवूनच”. निसर्ग हा कधीच आपली सर्व गणिते जुळून देत नाही, पण संयम, सजगता आणि सहनशीलता या त्रिसूत्रींनी जर शेतकरी पुढे गेला, तरच जगाचा पोशिंदा आर्थिकदृष्ट्या ही सक्षम होईल!