Fake Seed Racket

कृषी विभागाची धडक कारवाई ; ८.४६ लाखांचे बोगस उडीद बियाणे जप्त…

बोगस बियाणांच्या ८.४६ लाख किमतीच्या ४८० बॅग जप्त!

अक्कलकोट, दि. २६ : अक्कलकोट तालुका कृषी विभागाने बोगस उडीद बियाणे विक्रीप्रकरणी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ४६ हजार ७२० रुपयांचे ४८० बॅग बोगस बियाणे जप्त केले. या कारवाईमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शेतकरी संभाव्य फसवणुकीपासून वाचले आहेत.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दि. २६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बोगस उडीद बियाणे विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या ‘NUL-7 (विश्वास)’ या उडीद वाणाच्या बॅगची हुबेहूब नक्कल करून विक्रीसाठी आणलेल्या ४८ बॅग जप्त केल्या. तसेच अक्कलकोट येथील आबा कृषी सेवा केंद्राच्या गोदामात साठवून ठेवलेल्या आणखी ४३२ बॅग हस्तगत करण्यात आल्या, या प्रत्येकी ५ किलो वजनाच्या या एकूण ४८० बॅगची किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपये इतकी असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी दिली.

ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथकाने केली. या मोहिमेत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, मोहीम अधिकारी अजय वगरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बी. बी. बाबर, अशोक कांबळे तसेच निर्मल कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी वासुदेव नाटीकर सहभागी होते.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या बोगस बियाण्यांप्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!