शिरूरमध्ये बेकायदेशीर खतसाठा उघड, वेताळ केमिकल्सवर गुन्हा दाखल
पुणे, दि.२८: शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील गट क्रमांक 313 मध्ये बेकायदेशीर खत उत्पादन व साठवणूक करणाऱ्या वेताळ केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे 8.78 लाख रुपये किमतीचा खत साठा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. ही कारवाई २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता करण्यात आली.
जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील शिरूर विभागात नियमित कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांची तपासणी करत असताना, त्यांना मौजे न्हावरा (ता. शिरूर) येथील न्हावरा-गुणाट रोडलगतच्या गट क्रमांक ३१३ मध्ये एक खत उत्पादक कारखाना कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी भेट दिल्यानंतर महावीर नामक कामगार उपस्थित होता. त्याने कंपनीचे मालक संतोष दिनकर वेताळ (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) असल्याची माहिती दिली.
खत परवाण्याबाबत विचारणा केली असता, महावीरने एका मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपद्वारे परवाण्याची प्रत दाखवली. सदर परवाना वेताळ केमिकल्स प्रा. लि. या नावाने असून, परवाना क्रमांक LCFWD2025050134 आहे. या परवान्याची वैधता १३ मे २०२५ ते १२ मे २०३० पर्यंत आहे. या परवान्यानुसार केवळ मॅग्नेशियम सल्फेट (Mg ९.५%) या खताच्या उत्पादनास परवानगी होती. परवान्यावर संतोष वेताळ यांचे नाव डायरेक्टर म्हणून व महेंद्र गणपत बेलार यांचे नाव प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून नमूद होते.
यानंतर उत्पादन स्थळाची सखोल पाहणी केली असता, परवान्यात नमूद नसलेल्या आणि इतर कंपन्यांच्या नावाने बेकायदेशीररीत्या खताचे उत्पादन होत असल्याचे आणि पिशव्यांमध्ये भरून साठवणूक केल्याचे आढळून आले.
यानंतर जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील यांनी पंचायत समिती शिरूरचे खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी दिनेश अडसुळ यांच्यासोबत मिळून सविस्तर तपासणी केली. यामध्ये पुढील प्रमाणे खतसाठा आढळून आला; अमोनियम सल्फेट ९१७ बॅगा (प्रत्येकी ४० किलो वजनाच्या), एकूण किंमत ₹८,७१,१५०; मॅग्नेशियम सल्फेट – ११ बॅगा, प्रत्येकी २५ किलो वजनाच्या, किंमत ₹७,१५०; कॉस्टिक कॅल्सिन्ड मॅग्नेशिया (Mg Content ५१%, MgO ८५%, २०० मेश, ५० किलो) – ४४८ बॅगामॅग्नेशियम सल्फेटसदृश पदार्थ – १४० बॅगा
याशिवाय उत्पादनासाठी वापरली जाणारी मशिनरी, वजन काटा (Seco कंपनीचा), आणि खताची बॅग सील करणारे Revo Model – DA Bag Closer मशीन देखील आढळले. संपूर्ण तपासणीनंतर पंचनाम्यानुसार हा साठा जप्त करण्यात आला असून खतांचे नमुने घेतले गेले, अधिकाऱ्यांच्या व पंचांच्या सह्या असलेली कागदी लेबले लावून त्यावर लाखी सील करण्यात आली, सदर प्रकरणात लायसन्सधारक संतोष दिनकर वेताळ व प्रोडक्शन मॅनेजर महेंद्र गणपत बेलार हे शासनाची फसवणूक करत बेकायदेशीर खत उत्पादन व साठवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या विरुद्ध भारतीय नवीन दंड संहितेचे कलम 318(4), 3(5) तसेच खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 12, 21, 7, 19(सी), 28(1 अ), 35(1) व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3(2)(क), 7, 8, 10 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईसाठी तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) डॉ. प्रवीण कदम आणि कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांनी सखोल मार्गदर्शन केले.
सदर मोहीम कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक (पुणे विभाग) दत्तात्रय गवसाने आणि मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे व कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांच्या नियोजनातून राबविण्यात आली.