औंध जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात अमानुष अवस्था; मृतांनाही मिळत नाही सन्मान; प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे नातेवाईकांची ससेहोलपट!
पुणे,दि.१४: पुणे शहरात ससून रुग्णालयावर वाढलेल्या ताणामुळे पर्यायी म्हणून औंध जिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जात असले, तरी येथे मृतदेहांबाबतची व्यवस्था अक्षरशः धक्कादायक आहे. अर्ध्याहून अधिक पुणे जिल्ह्यातील शव औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले जातात. मात्र, येथे असलेल्या शवगृहातील ६ शितपेट्यांपैकी फक्त २ शितपेट्या कार्यरत असून, उर्वरित ४ शितपेट्या कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. या दुरुस्तीची गरज येथील प्रशासनाला आजवर भासलेली नाही, ही बाब चिंतेची ठरते.
शवविच्छेदनासाठी नेमलेले डॉक्टर ठरलेल्या वेळेवर उपस्थित राहत नाहीत. परिणामी, नातेवाईकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते. शवविच्छेदन झाल्यानंतरही शव ताब्यात घेण्यासाठी विलंब होत असल्याने तणावाचे प्रसंग निर्माण होतात. मृत्यूच्या दु:खात असलेल्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाकडून सन्मान आणि सहानुभूतीऐवजी हलगर्जीपणाच मिळतो.
शव गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या “मांजर पाठ” कापडासाठी नातेवाईकांकडून ₹८०० ते ₹१२०० इतकी रक्कम उघडपणे उकळली जाते. ही सेवा शासनाच्या नियमानुसार मोफत असावी, परंतु रुग्णालयात कुठल्याही अधिकृत पावतीविना पैसे घेतले जात असल्याने यामागे भ्रष्टाचाराचा स्पष्ट संशय आहे.
औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले जाणारे मृतदेह हे प्रामुख्याने अपघात, आत्महत्या, आजारपण आणि इतर कारणांमुळे मृत्यू पावलेले असतात. पण शवविच्छेदनाच्या सुविधा आणि मृतदेह ठेवण्याच्या अपुऱ्या व्यवस्था पाहता, ही सेवा अक्षरशः कोलमडल्याचे दिसते. यामुळे नातेवाईकांचे मानसिक हाल आणि प्रशासनाची असंवेदनशीलता समोर येते.
या साऱ्या प्रकरणामध्ये शवविच्छेदन विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांची जबाबदारी असली तरीही वरिष्ठ प्रमुख म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांचे दुर्लक्ष या सर्व प्रकाराला खतपाणी घालत असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. मृत व्यक्तींचा सन्मान राखणे ही एका सुसंस्कृत समाजाची जबाबदारी असून, त्या जबाबदारीपासून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा दूर पळताना दिसत आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.