नीरा डावा कालव्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मान्सूनपूर्व भगदाड दुरुस्त; नीरा डावा कालवा पूर्ववत, पालखी सोहळ्यासाठी पाणीपुरवठा सुरळीत…

कालवा फुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दुरुस्ती पूर्ण; पुणे पाटबंधारे विभागाची कौतुकास्पद कामगिरी!

बारामती,दि.१६: मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारामती तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लिमटेक परिसरातील नीरा डावा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कालवा फुटण्याची घटना घडली होती. बारामती, पिंपळी, लिमटेक आणि काटेवाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढे-नाल्यांचे पाणी थेट कालव्यात मिसळले आणि पाण्याचा दाब प्रचंड वाढला. परिणामी लिमटेकजवळील कालव्यात भगदाड पडले होते.

या घटनेबाबत माहिती देताना पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मा. दिगंबर डुबल यांनी सांगितले की, मान्सूनपूर्व पावसामुळे कालव्यातील वहनक्षमता अचानक वाढल्याने पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवणे कठीण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र संभाव्य मान्सून व संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती करण्याची गरज भासली, या आव्हानात्मक कामाची दखल घेत पुणे पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर कालव्याची दुरुस्ती सुरू केली. सोमवारी झालेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, याप्रसंगी झालेल्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले असून यावेळी मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, सोबतच अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल हेही उपस्थित होते.

पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डुबल व त्यांच्या सहकारी अभियंता-कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून कालव्याचे बांधकाम पूर्ववत केले असून, नियोजनानुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.

“श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कालव्याद्वारे सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल,” असा केलेला निर्धार कार्यकारी अभियंता डुबल यांनी पूर्ण करून दाखवला असून ही कामगिरी पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षमता, तत्परता आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!