फुलंब्री तालुक्यात ३३ गावांतील ९६ मातोश्री पाणंद रस्ता कामांमध्ये एकाच फोटोचा पुनर्वापर…
रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांची भूमिका संशयास्पद!
फुलंब्री (जि. संभाजीनगर), ता. ७ जुलै:
फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील तब्बल ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो पुनःपुन्हा वापरून सुमारे ५ कोटी १८ लाख रुपयांची अकुशल मजुरीची बिले उचलण्यात आल्याचे उघड झाले आहे.
पंचायत समितीच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत १६९ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ११९ कामांची प्रत्यक्षात सुरुवात झाली असून, उर्वरित ५० कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. मात्र सुरू असलेल्या कामांमध्येच मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
योजनेनुसार, प्रत्येक दिवशी कामावर मजुरांचा फोटो घेऊन तो प्रणालीवर अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र, योजनेतील रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांनी हा नियम धाब्यावर बसवत, एकाच ठिकाणचा मजुरांचा ग्रुप फोटो अनेक मस्टरमध्ये वापरून मजुरीचे मस्टर तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. या फोटोंच्या आधारे मंजूर केलेली बिले ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता दर्शवतात.
प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, दोषींवर तात्काळ कारवाई करून सरकारचा पैसा वसूल करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.