शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…
महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले असून, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याचे हे प्रतीक ठरले आहे.
पॅरिस येथे युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात ‘Maratha Military Landscapes of India’ या शीर्षकाखाली या किल्ल्यांची निवड करण्यात आली. हे किल्ले म्हणजे मराठा साम्राज्याच्या लष्करी कलेचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यशास्त्रातील कौशल्याचा परिपाठ आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले — शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, विजयरगड आणि साल्हेर तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ आहे. रायगड ही स्वराज्याची राजधानी व राज्याभिषेक स्थळ, तर राजगड हा महाराजांचा सर्वात प्रिय आणि प्रारंभीचा राजधानी किल्ला होता. प्रतापगड हे अफझलखानवधाचे ऐतिहासिक ठिकाण, तर पन्हाळा किल्ला महाराजांच्या मुत्सद्दी राजकारणाचा आणि युद्धकौशल्याचा साक्षीदार आहे. लोहगड, साल्हेर यांसारखे दुर्ग लष्करी दृष्टिकोनातून सामरिक महत्त्वाचे होते. सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी महाराजांनी उभारलेले सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि विजयदुर्ग हे किल्ले सागरी संरक्षणासाठी आजही प्रसिद्ध आहेत. दक्षिणेतील जिंजी किल्ला हा शिवरायांच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा ऐतिहासिक पुरावा आहे.
युनेस्को ही १९४५ मध्ये स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असून ती जगातील सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचे जतन व जागतिक प्रचार करते. १९७२ साली तयार झालेल्या “World Heritage Convention” अंतर्गत जागतिक वारसा स्थळांची निवड केली जाते. भारताने १९७७ साली या करारावर स्वाक्षरी केली असून, आजघडीला भारतात ४० पेक्षा अधिक जागतिक वारसा स्थळे आहेत. यामध्ये आता या १२ शिवकालीन गडांची भर पडत आहे.
या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार केलेली बांधणी, माची, गुप्त वाटा, वळणदार प्रवेशद्वारे, जलव्यवस्था, अन्नसाठ्याची सोय, आणि लढाईसाठी आवश्यक सर्व यंत्रणा या ठिकाणी अत्यंत कुशलतेने रचलेल्या आहेत. गनिमी काव्याच्या युद्धनीतीला पूरक अशा या दुर्गरचना जगभरातील किल्ल्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मानल्या जातात. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक युद्धगाथा असून, त्या दगडांमधून आजही इतिहास बोलताना दिसतो.
युनेस्को स्थळांची निवड करताना ऐतिहासिक महत्त्व, वैश्विक मूल्य, स्थापत्यातील वैशिष्ट्य, सांस्कृतिक परंपरेशी असलेली नाळ, व जतन व व्यवस्थापनाची स्थिती हे निकष विचारात घेतले जातात. या सर्व बाबतींत हे १२ किल्ले योग्य ठरले असल्यामुळे त्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
या मान्यतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी, युद्धनीती, आणि स्वराज्याचा विचार जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. हे केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर भारतासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. या किल्ल्यांमुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल, जागतिक पर्यटक आकर्षित होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल. या दुर्गांच्या रूपाने स्वातंत्र्य, आत्मभान आणि नेतृत्वाच्या भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचतील आणि भारताच्या स्वाभिमानाचे हे पान अधिक उजळून निघेल.