Pune today’s rain news

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; धरणांचा विसर्ग वाढला, प्रशासन सतर्क

पुणे, दि. 19 ऑगस्ट 2025 –

पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज दि. 19 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दि. 20 व 21 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा धोका कायम राहणार असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी 862 मिलीमीटर पाऊस पडतो, तर जून ते ऑक्टोबर महिन्यांची सरासरी 940 मिलीमीटर इतकी आहे. यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत जास्त म्हणजेच 141.4 टक्के पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाने दगा दिला आणि केवळ 74.6 टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात मात्र अद्यापपर्यंत फक्त 24.9 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

गेल्या २४ तासांत वेल्हे तालुक्यात तब्बल 208 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील हा सर्वाधिक पाऊस आहे. मुळशीमध्ये 59.4 मिमी, भोरमध्ये 29 मिमी, तर मावळमध्ये 54.9 मिमी पाऊस नोंदला गेला. मुळशी तालुक्यातील माले, मुठा, सावरगाव, कोळवण येथे 90 ते 164 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली, तर मावळ तालुक्यात लोणावळा व कार्ला भागात 70 ते 85 मिमी पाऊस झाला.

पावसामुळे धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढत असून काही धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. मुळशी धरणातून 19,500 क्यूसेक्स, पवना धरणातून 11,900 क्यूसेक्स, चासकमान धरणातून 18,410 क्यूसेक्स, भाटघर धरणातून 20,514 क्यूसेक्स, वीर धरणातून तब्बल 42,724 क्यूसेक्स तर उजनी धरणातून 26,600 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून संध्याकाळी सात वाजता 35,310 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. बंडगार्डन येथून सध्या 21,277 क्यूसेक्स तर दौंड येथील भीमा नदीत 7,844 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी घटना घडल्या आहेत. सिंहगड रोडवरील आनंदनगर परिसरातील शिवकश्यप अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. कसबा पेठेतील आरसीएम स्कूलजवळील घराची भिंत कोसळली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोर तालुक्यातील अंबाडे घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती, मात्र तात्काळ मलबा हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पुणे महापालिकेने वारजे, सिंहगड रोड, शिवाजीनगर, कसबा, हडपसर आणि ढोले पाटील रोड परिसरातील नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मनपा नियंत्रण कक्षामार्फत पी ए सिस्टमद्वारे सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मदत केंद्रे उभारण्यात आली असून तेथे प्रकाश, पाणी, निवारा यांसारख्या सर्व प्राथमिक सोयी करण्यात आल्या आहेत.

मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेल्या एकतानगर किनारी वस्ती, पाटील इस्टेट, भिडे पूल, ओंकारेश्वर मंदिर व लक्ष्मीनगर या भागात यंदा विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह अग्निशमन दल सतर्क असून नदीकाठच्या भागातील नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून अनुचित प्रकार अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीकरिता नागरिकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 020-26123371, 020-26133522, 9370960061 या क्रमांकांवर किंवा टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा. तसेच, पुणे महानगरपालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 020-25506800, 020-25501269, 020-67801500 हे क्रमांक उपलब्ध असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नियंत्रण कक्षासाठी 020-27423333, 020-67333333, 020-67331111 किंवा 9922501475 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!