मोनोरेलचा धडा; अंडरग्राउंड मेट्रोसाठी आधीच सुरक्षित मार्ग हवा!
मुंबई मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; अंडरग्राउंड मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबईत आज मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी अडकले. अग्निशमन दल, एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या बचावकार्य हाती घेत प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. हवेतल्या पुलावर असलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले, मात्र याच वेळी अंडरग्राउंड मेट्रोमध्ये अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री कशी केली जाणार, हा गंभीर प्रश्न पुढे आला आहे.
केवळ टोल-फ्री क्रमांक जाहीर करून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. मेट्रो प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना असणे अत्यावश्यक आहे. अतिवृष्टी किंवा पूरस्थितीत बोगद्यांत पाणी शिरल्यास त्याचा त्वरित निचरा करण्यासाठी अत्याधुनिक पंपिंग व ड्रेनेज व्यवस्था सक्षम ठेवणे गरजेचे आहे. तसेच, अंडरग्राउंड मार्गासोबत असलेल्या प्रत्येक स्थानकाचे वॉटरप्रूफिंग उच्च प्रतीचे व उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात.
सद्यस्थितीत अंडरग्राउंड मार्गाच्या सुरक्षिततेसाठी मेट्रोमध्ये विशेष “end evacuation system” कार्यरत असून प्रत्येक ट्रेनच्या दोन्ही टोकांवर आपत्कालीन दरवाजे आहेत, त्याद्वारे प्रवासी तात्काळ प्लॅटफॉर्मकडे किंवा ट्रॅकवर उतरू शकतात. ही प्रणाली लंडन, पॅरिस, सिंगापूर सारख्या शहरांमधील मेट्रोमध्ये वापरात असून, प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते, याशिवाय, प्रवाशांच्या श्वसनाच्या सुरक्षिततेसाठी एअर डक्ट्स आणि शुद्ध हवा पुरवठा प्रणाली सक्षम ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अचानक गाड्या थांबल्यास प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटणार नाही. त्याचबरोबर, प्रत्येक स्थानकावर प्रशिक्षित कर्मचारी, कंट्रोल रूममधून तत्पर मार्गदर्शन आणि नियमित सराव (drills) हे देखील अत्यावश्यक आहे.
मोनोरेल तर हवेत पुलावर होती आणि तेथेही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. परंतु जर अशीच आपत्ती जमिनीखालील अंडरग्राउंड मेट्रोमध्ये उद्भवली, तर फक्त दोन तासांचा विलंबदेखील कित्येक जीवांसाठी घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत जीविताचा धोका कैक पटीने वाढतो. त्यामुळे या घटनेतून प्रशासनाने वेळीच सावध होऊन, प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी पूर्वतयारी करून ठोस उपाययोजना करणे अनिवार्य आहे