ठराविक आयव्हीएफ सेंटर्स, गाईनॅकॉलॉजी क्लिनिक (मॅटरनिटी होम्स) तसेच थायलंड सारख्या परदेशातील प्रयोगशाळा यांच्या संगनमताने हजारो लाखो कोटींचा लिंगनिश्चितीचा काळाबाजार?
सत्यउपासक विशेष वृत्त/ दि.१० :
“आई” हा शब्द जिथे प्रेम, माया, त्याग, आणि जीवन यांचं प्रतीक आहे, तिथे आज त्याच मातृत्वाचं बाजारात रूपांतर झाल्याचे चित्र दिसत असून प्रयोगशाळांमध्ये आता जीवन तयार होतंय, आणि पैशाच्या टेबलावर त्याचं भविष्य ठरवलं जातंय; मातृत्वाचं पवित्र स्वप्न आता एका पॅकेज डील मध्ये बदललं असून “प्राथमिक सल्ला, टेस्ट ट्यूब, हार्मोन थेरपी, आणि शेवटी ‘यश’ मिळालं नाही तर पुढच्या सायकलमध्ये सूट!”वा रे आधुनिकता! इथे आई होण्यापूर्वी ‘इनव्हॉइस’ मिळतो आणि नाही झालं तर ‘क्रेडिट नोट’, आई होणं ही भावना नाही, तर ती आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनली असून स्त्रीचं शरीर आता उपचारांचं केंद्र नाही, तर नफा-तोट्याच्या तक्त्यातील एक आकडा बनलं आहे; ‘आई होण्याचं स्वप्न विकलं जातंय भावनांचा सौदा होतोय’ यामध्ये अनेक स्त्रिया शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाच्या भोवऱ्यात सापडतात. ‘आई होण्याच्या आशेने’ त्या जेव्हा क्लिनिकच्या दारात प्रवेश करतात, तेव्हा त्यांना वाटतं विज्ञान त्यांच्या स्वप्नांना आकार देईल. पण या वैज्ञानिक प्रक्रियेत मानवी मूल्यं, मातृत्वाची पवित्रता आणि स्त्रीच्या शरीराचं स्वातंत्र्य हरवून जात आहे; असेच म्हणावे लागेल!
मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास नेहमीच निसर्गाशी संघर्ष करत पुढे गेला आहे, पण काही दशकांपूर्वी निर्माण झालेल्या “आयव्हीएफ” या कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने आता निसर्गावरच ताबा मिळवण्याच्या दिशेने झेप घेतली असून आयव्हीएफ (In Vitro Fertilization) ही आधुनिक वैद्यकीय पद्धत अपत्यासाठी झगडणाऱ्या अनेक निसंतान दांपत्यांसाठी आशेचा किरण ठरली यात शंका नाही, आयव्हीएफ ही पद्धत योग्य हेतूने वापरली तर ती वरदान आहे,पण जेव्हा ती ‘हवे तसे अपत्य’ देण्याचे साधन बनते, तेव्हा ती मानवतेसाठी शाप ठरते! तिच्या आड लपलेली हीच भीषण आणि अमानवी बाजू आज समाजाला हादरवत असल्याचे वास्तव सत्यउपासक च्या तपासातून समोर आले आहे.
आयव्हीएफ म्हणजे काय?
आयव्हीएफ (IVF) म्हणजे In Vitro Fertilization म्हणजेच गर्भधारणा नैसर्गिक पद्धतीने न होता लॅबमध्ये केली जाते. या प्रक्रियेत स्त्रीचे अंडाणू आणि पुरुषाचे शुक्राणू बाहेर मिसळून भ्रूण तयार केला जातो आणि तो स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. हेच “सहाय्यक प्रजनन तंत्र” (ART – Assisted Reproductive Technology) म्हणून ओळखले जाते. एआरटी (ART) सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या अधिनियमानुसार आय व्ही एफ क्लिनिकचे दोन स्तर निश्चित करण्यात आले आहेत. स्तर १ (Level 1) क्लिनिकमध्ये केवळ इंट्रायुटेरिन इन्सेमिनेशन (Intrauterine Insemination – IUI) ही प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये वीर्य थेट स्त्रीच्या गर्भाशयात सोडून गर्भधारणा घडवून आणली जाते. तर स्तर २ (Level 2) क्लिनिकमध्ये गर्भधारणेसाठी आवश्यक सर्व वैज्ञानिक प्रक्रिया केल्या जातात, जसे की गॅमेट्स (वीर्य आणि अंडाणू) शस्त्रक्रियेद्वारे संकलन करणे, अंडाणू शरीराबाहेर हाताळणे, वीर्याद्वारे अंडाणू फलित करणे, तयार झालेला भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करणे तसेच भ्रूण किंवा गॅमेट्स दीर्घकाळासाठी साठवणे. अशा प्रकारच्या क्लिनिक्सना संशोधन करण्याचीही परवानगी देण्यात आलेली आहे. एआरटी बँकांचे मुख्य कार्य म्हणजे वीर्यदान करणाऱ्यांची तपासणी, नोंदणी आणि त्याचे योग्य साठवण करणे, अंडाणू दात्यांची नोंदणी व तपासणी करून त्यांची माहिती राष्ट्रीय नोंदणी (National Registry) मध्ये नियमितपणे अद्ययावत ठेवणे. या बँका वीर्य व अंडाणू सुरक्षितरीत्या साठवण्याबरोबरच त्यांचा वापर, नोंदी व पुरावे यांचे पालन सुनिश्चित करतात.
कायद्यातील तरतुदी
Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques (PCPNDT) Act, 1994 आणि Assisted Reproductive Technology (ART) Act, 2021 या कायद्यांनुसार भ्रूणाचे लिंग ठरवणे, सांगणे किंवा निवडणे हा गंभीर गुन्हा असून अशा केंद्रांवर कारवाई, दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे, सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (ART) अधिनियम 2021 अंतर्गत कलम 26 नुसार, कोणतेही IVF किंवा ART क्लिनिक कोणत्याही जोडप्याला अथवा महिलेला पूर्वनिश्चित लिंगाचे बाळ मिळेल अशी हमी देऊ शकत नाही. या कायद्याने लिंग निवड (Sex Determination) आणि लिंगावर आधारित भ्रूण प्रत्यारोपण (Embryo Transfer) करण्यास सक्त मनाई केली आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने पुरुष किंवा स्त्री बालकाचा जन्म निश्चित करण्यासाठी शुक्राणूंचे विभाजन (sperm separation) अथवा X-Y क्रोमोसोम्सचे वेगळेकरण करण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर आहे. याशिवाय, कोणत्याही डॉक्टराने किंवा वैद्यकीय संस्थेने अशा औषधांचा, उपचारांचा किंवा उपकरणांचा वापर करू नये ज्यामुळे भ्रूणाचे लिंग ठरवले जाऊ शकते किंवा त्यावर परिणाम होऊ शकतो, याखेरीज कोणत्याही परिस्थितीत भ्रूणाचे लिंग ठरवणे, सांगणे किंवा ग्राहकाला अशा प्रकारे माहिती देणे हा दंडनीय गुन्हा आहे, याच अधिनियमात सर्व ART क्लिनिक आणि बँकांना त्यांच्या उपचारांतील यश दर (Success Rate), अपयश दर, उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या, आणि त्यांच्या उपचारांचे निकाल या सर्वांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. प्रत्येक क्लिनिकने आपले उपचार परिणाम नियामक संस्थेकडे नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या दाव्यांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवता येईल, एकंदरीत ही प्रक्रिया मूळतः वैद्यकीय गरजांसाठी होती, पण सत्यउपासकच्या तपासात असे उघड झाले आहे की पुणे शहरातील काही आयव्हीएफ क्लिनिकमध्ये विज्ञानाचा वापर करून “मुलगाच जन्माला यावा” अशी गुप्त सोय केली जाते, याची संपूर्ण कार्यपद्धती आणि ठराविक आयव्हीएफ सेंटर्स, गाईनॅकॉलॉजी क्लिनिक (मॅटरनिटी होम्स) तसेच थायलंड सारख्या परदेशातील प्रयोगशाळा यांच्या संगनमताने हजारो लाखो कोटींचा लिंगनिश्चितीचा काळाबाजार? तसेच आरोग्य प्रशासन झोपेत की शासनाची मूकसंमती याचा उलगडा भाग दोन मध्ये…