Pune ZP’s Vision Turning Dreams into Destinations

पुणे जिल्हा परिषदेच्या “पुणे मॉडेल स्कूल” उपक्रमातून विद्यार्थ्यांचे अमेरिकेत पाऊल!

झेडपीचे विद्यार्थी पोहोचले थेट अमेरिकेत !

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंतराळ शिक्षणाला नवे पंख!

पुणे, दि १८:  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक विज्ञानविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या “पुणे मॉडेल स्कूल” या सुप्त उपक्रमांतर्गत निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील NASA आणि अन्य महत्त्वाच्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत अंतराळ विज्ञानाचे रोमांचकारी जग जवळून अनुभवता आले आहे.

विद्यार्थ्यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथील National Air and Space Museum येथे भेट देत रॉकेटची रचना, उपग्रहांची उभारणी, जगभरातील अंतराळ मोहिमा आणि मानवाच्या अंतराळ संशोधनातील ऐतिहासिक क्षण यांचा सखोल अभ्यास केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा या संग्रहालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मॉडेल्स, यानांचे अवशेष आणि अंतराळवीरांचे प्रयोग यांमागचे विज्ञान समजून घेण्याची अनोखी संधी मिळाली एवढेच नाही तर अभ्यासदौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासालाही भेट दिली. भारताचे राजनैतिक अधिकारी श्री. विजय क्वात्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत परराष्ट्र व्यवहार, जागतिक सहकार्य, विज्ञान-तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले, यावेळी ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत अमेरिकेत शैक्षणिक प्रवास करण्याचे कौतुकही त्यांनी केले.

“पुणे मॉडेल स्कूल” उपक्रमाचा उद्देश ग्रामीण मुलांना आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील शैक्षणिक अनुभव देणे हा आहे. या अनोख्या प्रवासामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दलची आवड अधिक दृढ होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांचा हा परदेशातील पहिला शैक्षणिक दौरा उत्साहवर्धक ठरत असून, पुढील काही दिवसांमध्ये ते NASAतील आणखी शैक्षणिक सत्रांना भेट देणार आहेत.

जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वी या दौऱ्याची माहिती जाहीर केली होती. “पुणे मॉडेल स्कूल” उपक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक अनुभव देणे हा उद्देश असून, NASA अभ्यासदौरा हा त्याचाच एक भाग असून सद्यस्थितीत विद्यार्थी सुरक्षितपणे अमेरिकेत पोहोचले असून सर्व नियोजित शैक्षणिक कार्यक्रम उत्साहात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!