A warming planet, a melting future.

आपण जगतोय… की हळूहळू मरतोय? शहाणपण हरवलेल्या विकासाची किंमत!

सत्यउपासक विशेष: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 99% लोक प्रदूषित हवा घेत आहेत, म्हणजेच पृथ्वीवरील जवळपास सर्वच मानवी जीवांचा प्रवास प्रत्येक घेणाऱ्या श्वासा द्वारे मृत्यूच्या दिशेने सुरू आहे का? हा प्रश्न पडतो. 

जगातील सर्वाधिक प्रदूषित १०० शहरांपैकी ६३ शहरे भारतीय असून हा आकडा केवळ आकडा नाही तर आपल्या अस्तित्वावर कोसळत असलेला एक अदृश्य महाविनाश आहे. हवेतील ओझोन, धूळकण, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखी रसायने प्रत्येक श्वासा-श्वासात शरीरात प्रवेश करतात आणि दमा, फुप्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक, त्वचेचे आजार यांना आमंत्रण देत आहेत.

आज प्रश्न असा आहे की आपण जगतोय की हळूहळू मरतोय? शहरांचा धूर, उद्योगांचा कचरा, वाहनांचा धूर, इमारतींचा प्रकाश, जंगलांची कत्तल, नद्यांचे प्रदूषण या सर्वांचा परिणाम पुढील पिढ्यांना भोगावा लागणार असून स्वच्छ हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश, चांदण्यांनी भरलेले आकाश, पावसाचा नैसर्गिक ताल, हिमालयाची स्थिरता ही सर्व जीव जंतूंच्या हक्काची संपत्ती आहे, पण आपण त्या हक्कावर अतिक्रमण करत आहोत. आज आपण काहीच बदललं नाही तर उद्या सर्वांना जगण्यासाठी हवाच नसेल हे विसरून चालणार नाही, आपण जगतोय की हळूहळू मरतोय, हा प्रश्न आता केवळ भावनिक नाही तर वैज्ञानिक आणि वास्तववादी झाला आहे. आपण ज्या हवेत श्वास घेतो ती हवा आता जीवन देणारी राहिली नाही; तर ती हळूहळू जीवन हिरावून घेणारी बनत चालली आहे.

 बांधकामांचा कॉंक्रिटीकरणाचा पूर हवेतील प्रदूषण या सगळ्यामुळे आकाशही धूसर झाले असून याने दिवसाचा स्वच्छ सूर्यप्रकाश  मंदावला आहे.

सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या “स्वयंशुद्धी” व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असून वायुमंडलातील हानिकारक प्रदूषकांचे नैसर्गिक पद्धतीने विघटन करून हवा पुन्हा स्वच्छ करण्याची क्षमता सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रॉक्सिल (OH) रेणूंमध्ये असते हे हायड्रॉक्सिल रेणू वातावरणातील सर्वात शक्तिशाली ऑक्सिडायजिंग घटक मानले जातात, परंतु या रेणूंची निर्मिती पूर्णपणे सूर्यप्रकाशावर अवलंबून असून सूर्यकिरण ओझोनचे प्रकाशीय विघटन करतात, त्यातून तयार होणारे ऊर्जायुक्त ऑक्सिजन अणू पाण्याच्या वाफेशी प्रतिक्रिया देतात आणि या प्रक्रियेत हायड्रॉक्सिल रेणू तयार होतात. सूर्यप्रकाश जसा स्वच्छ आणि प्रखर असेल, तशी हायड्रॉक्सिल निर्मिती अधिक होते आणि पृथ्वीची नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया अधिक शक्तिशाली होते.

हे हायड्रॉक्सिल रेणू प्रदूषकांसाठी जणू शिकाऱ्यांप्रमाणे काम करतात, जसे कार्बन एकदर्शक (कार्बन मोनॉक्साइड), मीथेन, वायुमधील अस्थिर सेंद्रिय संयुगे, औद्योगिक धूर, रासायनिक वायू आणि धुक्यासारख्या धुरक्याचे निर्माण करणारे नायट्रोजनयुक्त संयुगे यांसारख्या प्रदूषकांशी तात्काळ प्रतिक्रिया देऊन त्यांचे रासायनिक विघटन करतात, त्यामुळे हवेतील प्रदूषण टिकून राहत नाही, तर त्याचे रूपांतर कमी हानिकारक पदार्थांमध्ये होते. पृथ्वीचे वातावरण कायम शुद्ध राहण्यामागे या सतत चालू राहणाऱ्या सूर्यप्रकाश-आधारित ऑक्सिडेशन प्रक्रियेचा मोठा वाटा असून सूर्यप्रकाश जितका अडथळा नसलेला असेल, तितकी पृथ्वीची स्वयंशुद्धी प्रक्रिया प्रभावी ठरते, या सर्वांसाठी स्वच्छ हवामान, निर्मळ आकाश आणि मोकळा सूर्यप्रकाश असल्यास वातावरणातील नैसर्गिक स्वयंशुद्धी यंत्रणा वेगाने कार्य करते आणि प्रदूषण लवकर कमी होते.

याशिवाय सूर्यप्रकाशामुळेच मीथेनसारख्या प्रबळ हरितगृह वायूचे आयुष्य कमी होते, कारण हायड्रॉक्सिल रेणू त्याचे त्वरित विघटन करतात. त्यामुळे सूर्यप्रकाश हा केवळ प्रकाश किंवा उष्णतेचा स्रोत नसून, हवामान स्थिर ठेवण्याचा आणि पर्यावरण जपण्याचा सर्वात मोठा नैसर्गिक रक्षक आहे. पृथ्वी स्वतःला शुद्ध ठेवते याचा अर्थच असा की सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तेव्हाच वातावरणातील प्रदूषणाविरुद्धची ही नैसर्गिक झुंज प्रभावी ठरते परंतु सध्या धूर, धूळ, धुरकट धुके, कारखान्यांचा धूर किंवा शहरातील प्रदूषण सूर्यप्रकाश अडवत असल्याने हायड्रॉक्सिलची निर्मिती मंदावत असून पृथ्वीची नैसर्गिक शुद्धीकरण प्रणाली पूर्णतः लोप पावली आहे.

पृथ्वीची स्वयंशुद्धी जपण्यासाठी सूर्यप्रकाशाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. सकाळच्या प्रथम किरणांपासून ते दुपारच्या तेजस्वी प्रकाशापर्यंत प्रत्येक रुपात सूर्यप्रकाश जीवसृष्टीला नवी ऊर्जा देतो. सूर्यप्रकाशातील नैसर्गिक ऊष्णता जमिनीतील हानिकारक जंतूंना नष्ट करते, हवेतले विषारी घटक कमी करते आणि वातावरणातील आद्र्रता संतुलित ठेवते. घरातील ओलसर कोपरे, बुरशीचे डाग, दुर्गंध, तसेच अंधारामुळे तयार होणारे जंतू यांना सूर्यप्रकाश हा सहज आणि नैसर्गिक उपाय आहे.

सूर्यप्रकाशामुळे शरीरात जीवनसत्व ‘ड’ तयार होते, जे हाडांसाठी, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आणि मानसिक ताजेपणासाठी आवश्यक असते. वनस्पतींसाठी प्रकाश म्हणजेच अन्ननिर्मितीची प्रक्रिया; सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवरील अन्नसाखळीच कोलमडून पडेल. शेतातील बियाण्यांना उगवण्यासाठी उष्णता हवी, झाडांना वाढण्यासाठी उजेड हवा, नद्यांचा पाणचक्र सुरळीत ठेवण्यासाठी तापमान हवे  या सर्वांचे केंद्रस्थान सूर्यच आहे, म्हणूनच सूर्यप्रकाश हा केवळ उजेड नसून पृथ्वीची नैसर्गिक स्वच्छता, संरक्षण आणि संतुलन राखणारी अदृश्य प्रक्रिया आहे. निसर्गाला स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी जे सामर्थ्य लाभले आहे, त्यातील सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे सूर्यप्रकाश, पण मग प्रश्न असा पडतो; निसर्ग स्वतःला शुद्ध करू शकतो, पृथ्वी स्वतःला संतुलित ठेवू शकते, मग आपण माणसं मात्र स्वतःला आणि आपल्या शहरांना स्वच्छ ठेवण्यात एवढी असमर्थ का? सूर्य रोज आपले काम प्रामाणिकपणे करतो… मग आपण कोणत्या अंधारात जगत आहोत?

एकीकडे दिवसाचा स्वच्छ सूर्यप्रकाश मंदावला तर दुसरीकडे बदलती जीवनशैली आणि शहरांतील भरकटलेल्या विकासातून निर्माण झालेले प्रदूषण, कृत्रिम प्रकाशाने अंधाराला पळवून लावले असून मानवाच्या नैसर्गिक जीवनचक्राला खिळ बसवली आहे, ताऱ्यांनी भरलेले आकाश आता शहरांतून दिसेनासे झाले असून काही दशक वर्षांपूर्वी रात्रीवर नजर टाकली की असंख्य तारे, शांतता आणि अंधाराची शीतलता दिसायची, पण आता धूळ आणि धुराचे साम्राज्य यासोबतच कृत्रिम दिवे, जाहिरात फलकांचे तेज, इमारतींमधून झिरपणारा प्रकाश याने अंधारालाही कैद केले, त्याचा परिणाम निसर्गाच्या जीवन चक्रावर झाला असून परिणामी पक्ष्यांचे स्थलांतर चुकू लागले, काजव्यांची चमक मंदावली, समुद्री कासवांना मार्ग सापडेनासा झाला, आणि मानवाच्या निद्रेचे चक्रही तुटले. मन, शरीर, निसर्ग आणि प्राणी ही संपूर्ण साखळीच पूर्णतः संपुष्टात येऊ लागली आहे!

निसर्गाची संपूर्ण जैवविविधता तुटत चालली आहे का? या प्रश्नासोबतच पक्षी, किटक, झाडे, वनस्पती, पशुपक्षी, नद्या आणि पर्वत हे सर्व एका अदृश्य धाग्यांनी जोडलेले आहेत हे विसरून चालणार नाही, यातील एक धागा तुटला तरीही संपूर्ण जीवन चक्र कमकुवत होतं जाणार हे वास्तव असून आज अवेळी अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे कधी नद्या उफाणत येतात किंवा उन्हाळ्यात कोरड्या पडतात, जंगलं मरतात, प्राणी विस्थापित होतात, या सर्वात मानव स्वतःला सुरक्षित समजत असला तरी सत्य हे आहे की पृथ्वी आजारी पडली की मानवही आजारी पडतो; पृथ्वीवर विनाश सुरू झाला की मानवही त्यातून सुटू शकणार नाही.

आपण म्हणतो विकास हवा, प्रगती हवी पण जर श्वास घ्यायलाही हवा उरली नाही तर ही प्रगती कसली? पृथ्वीला माणसाची गरज नाही; उलट माणसाला पृथ्वीची गरज आहे. आपण निसर्गाला नष्ट करतोय म्हणजे स्वतःच्या मुळांवर कुऱ्हाड चालवतोय. निसर्ग आपली चूक कधीतरी भरून काढतो आणि तो दिवस दूर नाही. पावसाचे संतापलेले ढग, कोसळणारे डोंगर, वितळणाऱ्या हिमनद्या, आक्रोश करणारी हवा हे सर्व निसर्गाचे इशारे असून पृथ्वीवरील साधारण ७० टक्के भूभाग पाण्याचा असून हवामानात फक्त एक डिग्री तापमान वाढ झाली तरी या पाण्याचं बाष्पीभवन झपाट्याने वाढते, वाढलेलं बाष्पीभवन ढग तयार करतो, आणि हेच ढग अनियंत्रितपणे गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या स्वरूपात‌ कोसळतात यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होते, या सर्वांमुळे अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होत असून हवामानचक्र पूर्णपणे अस्थिर होत आहे. हिमालयातील हिमनद्या वितळत आहेत; डोंगरांच्या पायथ्याशी असलेली घरे, गावे दिवसेंदिवस धोक्यात येत आहेत. उत्तराखंड, हिमाचल, जोशीमठ या भागात भूमी सरकत आहे, दऱ्या-खोरी कोसळत आहेत. ही नैसर्गिक आपत्ती नसून मनुष्य निर्मित भरकटलेल्या विकासा सोबतच प्रदूषण, जंगलतोड, अवैज्ञानिक बांधकाम आणि अनियंत्रित हवामान बदल यांचे थेट दुष्परिणाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!