Bribe for Posting Anti-Corruption Bureau Catches

बदलीच्या पदस्थापनेसाठी तीन लाखांची लाच घेताना आरोग्यसेवक रंगेहाथ अटक!

पुणे, दि.२: बदलीनंतर पदस्थापना देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३, रा. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर करण्यात आली.

याबाबत एका ४१ वर्षीय आरोग्यसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराची जून २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात बदली झाली होती. मात्र बदलीनंतरही त्यांना प्रत्यक्ष पदस्थापना न देता आरोग्य उपसंचालक कार्यालयातच थांबवून ठेवण्यात आले होते. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा (ता. इंदापूर) येथे रिक्त असलेल्या पदावर नेमणूक मिळावी यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना भेटला असता, त्यांनी घ्यार याला भेटण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी घ्यार याने संबंधित पदस्थापनेसाठी डॉ. पवार यांच्यासाठी तीन लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी थेट मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला.

शुक्रवारी ठरलेल्या रकमेपैकी लाच स्वीकारताना घ्यार याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोग्य विभागातील बदली आणि पदस्थापना प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!