महापालिकेच्या ‘अभय योजने’तून दोन महिन्यांत ७७३.२५ कोटींची विक्रमी वसुली
पुणे, दि.१५: पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अभय योजनेच्या कालावधीत उच्चांकी ७७३.२५ कोटी रुपयांची विक्रमी मिळकतकर वसुली झाली असून, या यशामुळे मनपाच्या तिजोरीला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शहरातील निवासी, बिगरनिवासी तसेच मोकळ्या जागांवरील वर्षानुवर्षे थकित असलेल्या मिळकतकरामुळे मनपावर मोठ्या प्रमाणात थकबाकी साचली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थकबाकीवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जात असल्याने ही थकबाकी अधिक वाढत होती.
नागरिकांची वाढती थकबाकी आणि करदात्यांकडून येणारी मागणी लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी दि. १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘अभय योजना’ जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील शास्ती व दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट देण्यात आली. यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आणि मोठ्या प्रमाणात कर भरण्यास प्रतिसाद मिळाला.
अभय योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कर आकारणी व कर संकलन विभागाने विशेष मोहीम राबवून उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रीत केले. त्याचा परिणाम म्हणून अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १.२४ लाख मिळकतधारकांनी मिळकतकर भरून एकूण ७७३.२५ कोटी रुपयांची वसुली झाली. ही रक्कम यापूर्वीच्या सर्व अभय योजनांच्या तुलनेत उच्चांकी आहे.
मनपाच्या एकूण मिळकतकर वसुलीतही लक्षणीय वाढ झाली असून, आजअखेर एकूण २५५७.९५ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. गत आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२५ अखेर ही रक्कम २३४५.९० कोटी रुपये इतकी होती. यापूर्वी सन २०२०-२१ मध्ये चार महिन्यांच्या अभय योजनेत सर्वाधिक ४८५.६७ कोटी रुपयांची वसुली झाली होती. मात्र, यावर्षी केवळ दोन महिन्यांत त्या विक्रमालाही मागे टाकत पुणे महापालिकेच्या अभय योजनेने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
या विक्रमी वसुलीमुळे मनपाच्या विकासकामांसाठी आर्थिक बळकटी मिळणार असून, करदात्यांनी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.