The Future of Transport Beyond the Roads

ट्रॅफिकमुक्त भविष्यासाठी नवीन पर्याय!

वाढती शहरे, वाढते प्रदूषण, आकुंचित रस्ते,ट्रॅफिक आणि शहरांची कोंडी यासाठी शाश्वत वाहतुकीचा नवा मार्ग!

सत्यउपासक विशेष लेख:

पुणे, मुंबई, नाशिकसह दिल्ली, कोलकत्ता यांसारख्या देशातील प्रमुख महानगरांमध्ये आज प्रदूषण आणि वाहतूक कोंडी ही केवळ असुविधा न राहता गंभीर सामाजिक आणि आरोग्याची समस्या बनली आहे. शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, उंच इमारती, वाढलेली वाहने आणि तुलनेने आकुंचित होत जाणारे रस्ते यामुळे शहरी जीवनाचा श्वासच कोंडत चालला आहे. अपेक्षित पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, वेळेवर पोहोचण्याच्या क्षमतेवर आणि एकूणच जीवनमानावर होत आहे.

या पार्श्वभूमीवर आता पारंपरिक रस्ते विस्तार किंवा फ्लायओव्हर यांपुरते मर्यादित न राहता वाहतुकीसाठी जलवाहतूक आणि एअर-स्पेस ट्रान्सपोर्टेशन या पर्यायांकडे गांभीर्याने पाहणे अपरिहार्य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने महानगरांमध्ये ड्रोनद्वारे कुरिअर सेवा, फूड डिलिव्हरी, अत्यावश्यक औषध पुरवठा यांसारख्या मनुष्यविरहित सेवांचा विस्तार केल्यास रस्त्यांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आज ज्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने घरपोच मिळत आहेत, त्या जर हवेतून जलद आणि सुरक्षित पद्धतीने उपलब्ध झाल्या, तर नागरिकांना शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करण्याचा पर्यायही खुला होईल. परिणामी मानसिक शांतता, शुद्ध हवा आणि आरोग्याचे लाभ मिळू शकतील.

आजच्या काळात केवळ पारंपरिक रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहणे अपुरे ठरत असून ड्रोन, जलवाहतूक आणि एअर-स्पेस ट्रान्सपोर्ट यांसारख्या आधुनिक व पर्यायी वाहतूक प्रणाली अत्यावश्यक बनल्या आहेत. वाहतूक व्यवस्था जितकी प्रगत, वेगवान आणि सुलभ असेल तितक्या वेगाने अर्थव्यवस्था, व्यापार, उद्योग आणि सामाजिक विकासाला चालना मिळते. विशेषतः ड्रोन ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात Geo-fencing, Remote ID, Blockchain-based parcel tracking आणि AI-enabled threat detection यांसारख्या अत्याधुनिक प्रणाली विकसित होत असून त्याद्वारे गैरवापर, तस्करी, घुसखोरी आणि सुरक्षेचे संभाव्य धोके प्रभावीपणे नियंत्रित करता येतात. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेता निसर्गपूरक, बहुआयामी, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित वाहतूक व्यवस्था उभारणे हा पर्याय नसून आज काळाची अपरिहार्य गरज असून विशेषतः वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांचे चित्र सर्वसामान्यांना वारंवार दिसते, अशा परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्स किंवा ड्रोनद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही आजच्या काळाची गरज बनली आहे, यासाठी सुरुवातीला अत्यावश्यक सेवांसाठी ड्रोन ट्रान्सपोर्टेशन वापरून पुढील टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी ड्रोन पॉड्स, हेलीपॅड्स आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे शक्य आहे. यासाठी शासनाने ‘ई-एअर पाथ’ संकल्पनेवर काम करून संशोधन, तंत्रज्ञान आणि आवश्यक सवलती स्टार्टअप कंपन्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या पर्यायांना विरोध करताना रोजगार नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन पुढे आले, तेव्हा जुन्या रोजगारांच्या जागी नवीन संधी निर्माण झाल्याचं दिसून आले, याचप्रमाणे ड्रोन तंत्रज्ञान, एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट, डेटा अ‍ॅनालिटिक्स, मेंटेनन्स, सॉफ्टवेअर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. युवा वर्ग हा नव्या संधींनुसार स्वतःला घडवतोच; त्यामुळे प्रगती थांबवणे हा उपाय ठरू शकत नाही.

ड्रोन कुरिअर सेवांचा वापर अमली पदार्थ तस्करीसाठी होऊ शकतो, हा आणखी एक आक्षेप घेतला जातो. मात्र आज रस्त्यांमार्गेही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तस्करी सुरू आहे. त्यामुळे हा मुद्दा तंत्रज्ञानाचा नव्हे, तर नियमन आणि अंमलबजावणीचा आहे. सोबतच ड्रोन-आधारित सिस्टम लागू करताना कायदेशीर आणि सुरक्षा-संबंधित अडचणी येऊ शकतात जसे की हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि प्रायव्हसी‌ यावरती कडक नियमावली, ट्रॅकिंग सिस्टीम, एआय आधारित निरीक्षण आणि परवानाधारक सेवांपुरते मर्यादित वापर यांसारख्या अटी घालून शासन हे धोके नियंत्रणात ठेवू शकते.

आजच्या काळात ड्रोन, जलवाहतूक आणि एअर-स्पेस ट्रान्सपोर्ट अत्यावश्यक असून वाहतूक व्यवस्था प्रगत असेल तर अर्थव्यवस्था, व्यापार आणि सामाजिक विकास वेगाने होतो, इतिहासाचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे स्पष्ट होते की पुरातन काळातही वाहतूक व्यवस्था अत्यंत प्रगत, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीने नियोजित होती. याची प्रचीती सिंधू संस्कृतीपासूनच येते. तसेच प्राचीन भारतात गंगा, सिंधू, गोदावरी, नर्मदा यांसारख्या विशाल नद्यांचा उपयोग केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणांसाठीच नव्हे, तर प्रभावी जलवाहतुकीसाठीही केला जात होता. या जलमार्गांमुळे व्यापार आणि दळणवळण सुलभ झाले, आणि त्यातूनच भारतीय संस्कृती अधिक समृद्ध झाल्याचे दिसून येते.

मात्र आज या जलवाहतुकीला पुनर्जीवित करायचे असेल तर नद्यांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण प्रदूषित, अतिक्रमित आणि दुर्लक्षित नद्यांवर शाश्वत जलवाहतूक शक्य नाही, यासाठी शासनाने औद्योगिक व सांडपाणी थेट नद्यांत सोडण्यावर कठोर निर्बंध घालणे, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, नदीपात्रातील अतिक्रमणे दूर करणे, नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने नदी सुधारणा करणे, तसेच स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञ यांना सहभागी करून नदी स्वच्छता व संवर्धन ही केवळ योजना न ठेवता लोकचळवळ बनवणे आवश्यक आहे, कारण नद्या स्वच्छ आणि जिवंत राहिल्या तर जलवाहतूक सुलभ होईल, रस्त्यांवरील ताण कमी होईल, प्रदूषण घटेल आणि पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होईल.

थोडक्यात, वाढती लोकसंख्या, वाढते प्रदूषण आणि असह्य ट्रॅफिक या समस्यांवर केवळ रस्ते वाढवणे हा एकमेव उपाय नसून जलवाहतूक, एअर-स्पेस ट्रान्सपोर्टेशन आणि ड्रोन आधारित सेवा हेच भविष्यातील शाश्वत पर्याय आहेत. याकरिता शासनाने दूरदृष्टी ठेवून संशोधन, नियोजन आणि पायाभूत सुविधा उभारणीस प्राधान्य दिल्यास शहरे श्वास घेण्यायोग्य होतील आणि नागरिकांना वाहतूक व प्रदूषणाच्या कचाट्यातून खऱ्या अर्थाने मुक्तता मिळेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!