शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे, दि. २७: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावीत तसेच दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई भासणार नाही, यादृष्टीने मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवणूक करावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सर्व बियाणे उत्पादक, वितरक, विक्रेत्यांनी समन्वयाने कामे करावे, या उद्देशाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय येथे आयोजित बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महासंचालक राहूल माहिवाल, राष्ट्रीय सूचना केंद्राचे वरिष्ठ संचालक अविनाश पेडगावकर, संचालक विस्तार व प्रशिक्षण रफीक नाईकवाडी, संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण सुनील बोरकर, महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंबादास मिसाळ, कृषी उपसंचालक बियाणे व नोडल अधिकारी साथी डॉ. प्रिती सवाईराम, यांच्यासह सियाम, मासा व माफदा बियाणे उत्पादक, विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेते उपस्थित होते.
कृषी राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. बोगस बियाण्यांवर आळा घालून शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, उच्च उत्पादनक्षम वाणांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे देशातील बियाणे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. यासाठी ‘साथी’ पोर्टल हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्याद्वारे उत्पादक आणि विक्रेत्यांना कायदेशीर अडचणीच्या वेळी पुरावा म्हणून मदत होणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर प्रास्ताविकात म्हणाले की, केवळ उच्च प्रतीच्या बियाण्यांच्या वापरामुळे पीक उत्पादनात सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘साथी’ पोर्टल विकसित केले असून, त्याची अंमलबजावणी खरीप हंगाम २०२३ पासून करण्यात येत आहे. बियाणे उत्पादक व विक्रेत्यांच्या संघटनांच्या सूचनांनुसार पोर्टलमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचेही श्री. बोरकर यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. प्रिती सवाईराम यांनी साथी पोर्टलची उद्दिष्टे, उपयोगिता, पोर्टलमध्ये उत्पादक, विक्रेत्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा आदीबाबत मार्गदर्शन केले, श्री .पेडगावकर यांनी पोर्टलचा वापर करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यात केले. तंत्र अधिकारी अनिल महामुलकर यांनी बियाणे कायद्यातील तरतुदी व बीटी कापूस बियाण्यात परवानगी नसलेल्या तणनाशक सहनशील जनुकीय रूपांतरित जनुकांच्या (Herbicide Tolerant Transgenic Genes) विक्रीस प्रतिबंधात्मक कार्यवाही संदर्भात मार्गदर्शन केले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते साथी पोर्टल मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.