Farmer ID Mandatory to Access All Agri Schemes

शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी फार्मर आयडी बंधनकारक…

२० मे पूर्वी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करा…

पुणे,दि. ३०: राज्यात कृषी व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि शेतकरीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने ॲग्रीस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, फार्मर आयडी नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्यानंतर राज्यातील सुमारे १.७१ कोटी खातेदारांपैकी तब्बल १.३२ कोटी शेतकऱ्यांनी आधीच आपली नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनीही २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचे डिजिटल ओळखपत्र तयार केले जात असून शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्याच्या मालकीच्या शेतीशी जोडून त्याला एकत्रित शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येतो. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख पटवणे सुलभ झाले असून कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर वाढल्याने शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद, पारदर्शक आणि थेट पोहोचण्यास मोठी मदत होत आहे.

फार्मर आयडीमुळे बियाणे, खते, औषधे यांसारख्या कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विविध योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे शेती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नोंदणीसाठी शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर भेट देऊ शकतात किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टलवर स्वतः ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय, नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास विभागनिहाय पुढील प्रमाणे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, अमरावती – अजितकुमार गेजगे : ९६५७१०९८०९, पुणे – संगीता ननावरे : ७५८८५०९४९२, कोकण – सोनाली वाडेकर : ९४०४९५३५१८, छत्रपती संभाजीनगर – शीतल कौदरे : ९१७२३१९६३७, नागपूर – अजितकुमार गेजगे : ९६५७१०९८०९, नाशिक – सोनाली वाडेकर : ९४०४९५३५१८

शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा मिळणार असून, कृषी क्षेत्र अधिक सक्षम व प्रगत होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!