मिसिंग लिंकने प्रवास वेगवान; पण सेल्फीच्या नादात अपघाताला आमंत्रण!
सत्यउपासक/ पुणे: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राज्य शासनाने लोकार्पण केलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासात मोठी सुसूत्रता आली आहे. नव्या बोगद्यांमुळे आणि सरळ मार्गामुळे वाहनधारकांचा अर्धा ते एक तास वेळ वाचत असून प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ झाला आहे. या प्रकल्पाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असतानाच काही निष्काळजी प्रवृत्तीमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
मिसिंग लिंक मार्गावरील रोप-वे पूल आणि बोगद्याजवळ काही नागरिक वाहन थांबवून सेल्फी काढताना दिसत असून पर्यटनाचा मोह आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात हे नागरिक स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालताना दिसत असून वेगवान द्रुतगती मार्गावर अचानक थांबणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरू शकतात, याकडे दुर्लक्ष होत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने स्पष्ट इशारा दिला आहे. प्रवासादरम्यान कुठेही वाहन थांबवणे, विशेषतः सेल्फी किंवा फोटोसाठी थांबणे, हे नियमबाह्य असून अशा प्रवाशांवर कडक कारवाई केली जाईल असे नमूद केले आहे, संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने जाहीर केले आहे.
द्रुतगती मार्गावर वाहन थांबवणे हा गंभीर वाहतूक नियमभंग असून त्यामुळे साखळी अपघाताची शक्यता वाढते. विशेषतः बोगद्याजवळ किंवा उंच पुलांवर दृश्यमानता मर्यादित असल्याने धोका अधिक वाढतो त्यामुळे नागरिकांनी उत्साहाच्या भरात स्वतःचे आणि इतरांचे जीवन धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्याच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात असताना, त्याचा योग्य आणि सुरक्षित वापर करणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. वेळ वाचवणाऱ्या या प्रकल्पाचा फायदा घेताना शिस्त आणि नियमांचे पालन केले, तरच या प्रकल्पाचा खरा उद्देश साध्य होईल अन्यथा काही क्षणांच्या सेल्फीमुळे मोठा अनर्थ ओढवू शकतो.