ॲग्री हॅकॅथॉनमुळे पुणे बनत आहे कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिलांना उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
पुणे, दि. १५ : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’चे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय, सिंचननगर येथे झाले. यावेळी बोलताना त्यांनी, “गतवर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाही देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ॲग्री हॅकॅथॉनच्या माध्यमातून पुणे हे विद्येच्या माहेरघरासोबतच कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे,” असे प्रतिपादन केले.
संयुक्त राष्ट्रांनी यंदाचे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असून राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये अधिकाधिक महिला शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रीनरोड इनोवेशन इस्रायलचे अध्यक्ष शफरीर गोडेल, ज्युरी कमिटी सहअध्यक्ष प्रा. डॉ. के. ई. लवांडे, डॉ. राजाराम देशमुख, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. उमाकांत दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य असून ऊस, साखर, भाजीपाला, फलोत्पादन आणि कृषी निर्यातीमध्येही राज्याने विशेष प्रगती केली आहे. कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून एआय पॉलिसीसाठी २०२५ च्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तसेच बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर केली असून यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासू नये यासाठी शासन पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. तसेच पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठीही आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या संकल्पनेतून ॲग्री हॅकॅथॉनची सुरुवात
माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात प्रचलित असलेली ‘हॅकॅथॉन’ संकल्पना कृषी क्षेत्रात आणण्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संकल्पना असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. कृषी क्षेत्रातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी गतवर्षी प्रथमच पुणे ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निवडलेल्या १६ नवकल्पनांपैकी १२ उत्पादनांना कृषी विद्यापीठांचे प्रमाणिकरण मिळाले असून चार उत्पादनांचा व्यापारी स्तरावर वापर सुरू झाला आहे. तसेच चार उत्पादनांचा कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यंदा १ हजार ३०० स्पर्धकांचा सहभाग…
यंदाच्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये मृदा आरोग्य, स्मार्ट जल व्यवस्थापन, एआय आणि रोबोटिक्स आधारित शेती यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, अक्षय ऊर्जा, हवामान-अनुकूल शेती, पीक संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल कृषी प्रशासन अशा नऊ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विविध राज्यांतील सुमारे १ हजार ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी महाराष्ट्रातील ८६७ स्पर्धकांचा समावेश आहे.
यावेळी प्रा. डॉ. के. ई. लवांडे यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश, कृषी विद्यापीठांमध्ये इन्क्युबेशन केंद्र उभारणी आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा अडीचपट अर्ज प्राप्त झाल्याचे सांगत, निवडलेल्या उत्पादनांना शासन स्तरावर प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत संशोधनाधारित उत्पादने आणि नवकल्पनांची माहिती घेतली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्मा प्रकल्प संचालक सूरज मडके, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ऍग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबाने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स कमिटी सदस्य चेतन देदिया, बँक ऑफ महाराष्ट्रच्या उप विभागीय व्यवस्थापक वर्षा थूल, कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी, स्टार्टअप उद्योजक, संशोधक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.