खरीपपूर्व माती आरोग्य पत्रिका अभियानात महाराष्ट्र देशात अव्वल!
माती नमुना संकलन, परीक्षण आणि माती आरोग्य पत्रिका वितरणामध्ये राज्याची सरशी…
सत्यउपासक/ पुणे: केंद्र शासनाच्यामाती आरोग्य पत्रिका ( Soil Health Card ) पोर्टलवरील २०२६-२७ वर्षातील उपलब्ध आकडेवारीनुसार, खरीप हंगामापूर्वी माती नमुना संकलन, परीक्षण आणि माती आरोग्य पत्रिका वितरणामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे; विशेष म्हणजे, राज्याने यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरीपपूर्व माती परीक्षण मोहीम राबवत राष्ट्रीय स्तरावर आघाडी घेतली आहे.
सॉईल हेल्थ कार्ड योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील पोषक घटकांची स्थिती समजून घेण्यासाठी आणि पिकानुसार संतुलित खत व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करणारी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत माती नमुने संकलित करून प्रयोगशाळेत परीक्षण केले जाते आणि त्यावर आधारित शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिका दिली जाते.
माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या गरजेनुसार खतांचा वापर करता येणार असून रासायनिक खतांचा संतुलित वापर, उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात एकूण ३ लाख १९ हजार ५६६ माती नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले. यापैकी २ लाख ३० हजार १८४ नमुन्यांचे परीक्षण एकट्या महाराष्ट्रात झाले असून देशातील एकूण तपासण्यांपैकी सुमारे ७२ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे माती परीक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.
यंदाच्या अभियानांतर्गत राज्यात ३ लाख २६ हजार ३०० माती नमुने संकलित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून त्यापैकी जूनअखेरच ७१ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. नमुना संकलन आणि परीक्षण या दोन्ही बाबींमध्ये महाराष्ट्राने देशातील इतर राज्यांपेक्षा सरस कामगिरी केली आहे, महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशात सुमारे ७४ हजार नमुन्यांचे परीक्षण केले आहे.
माती नमुन्यांच्या परीक्षणानंतर शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिका ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित केल्या जात असून, त्यामध्ये जमिनीतील अन्नद्रव्यांची स्थिती, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि पिकानुसार खत व्यवस्थापनाच्या शिफारशींचा समावेश असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनक्षमतेत वाढ साधणे शक्य होते.
राज्यातील विभागनिहाय कामगिरीचा आढावा घेतला असता कोकण विभागाने माती नमुना संकलन, परीक्षण आणि माती आरोग्य पत्रिका वितरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याखालोखाल लातूर विभागाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत दुसरे स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही विभागांनी निर्धारित उद्दिष्टांच्या तुलनेत सर्वाधिक प्रगती साधली आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर माती आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांच्या हाती पोहोचणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. यामुळे शेतकरी पेरणीपूर्वीच जमिनीच्या गरजेनुसार खतांचे नियोजन करू शकणार असून रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी करण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या या कामगिरीमुळे माती आरोग्य व्यवस्थापन, शाश्वत शेती आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या प्रसारामध्ये महाराष्ट्राने देशासाठी एक आदर्श निर्माण केल्याचे कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.