Rafiq Naikwadi Leading Agriculture with Vision and Integrity.

कर्तव्यनिष्ठ सेवेला मानाचा मुजरा!

सत्यउपासक वृत्त समूहाकडून रफिक नाईकवाडी यांच्या प्रदीर्घ, कर्तव्यनिष्ठ आणि लोकाभिमुख शासकीय सेवेचा सन्मान!!!

सत्यउपासक विशेष: शासकीय सेवेत अनेक अधिकारी येतात, आपली जबाबदारी पार पाडतात आणि सेवानिवृत्त होतात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ पदामुळे नव्हे तर त्यांच्या कार्यशैलीमुळे, संवेदनशीलतेमुळे, अभ्यासू वृत्तीमुळे आणि दूरदृष्टीमुळे कायम स्मरणात राहते, यापैकी कृषी संचालक श्री. रफिक नाईकवाडी हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे.

शेतकरी, कर्मचारी आणि शासन यांच्यात विश्वासाचा सेतू म्हणून त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात उल्लेखनीय भूमिका बजावली असून शेतकऱ्यांच्या अडचणी, कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि शासनाच्या धोरणात्मक गरजा यांचा समतोल साधत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे, प्रशासन म्हणजे केवळ फाईलवरील नोंदी नसून त्यामागे माणसांचे प्रश्न, अडचणी आणि त्यांच्या अपेक्षा असतात, ही जाणीव त्यांच्या प्रत्येक निर्णयातून केलेल्या कामातून प्रकर्षाने जाणवली आहे.

त्यांच्या प्रदीर्घ सेवा प्रवासात त्यांनी कृषी क्षेत्रातील अनेक ऐतिहासिक बदल प्रत्यक्ष अनुभवले असून त्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे, पारंपरिक शेती पद्धतीपासून ते आधुनिक शेती पद्धतीपर्यंत, त्यानंतर औद्योगिक व तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीच्या विस्तारापर्यंत, तसेच बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांपर्यंत आणि आजच्या डिजिटल कृषी सुधारणांच्या युगापर्यंत त्यांनी काळाची गरज ओळखून स्वतःला सातत्याने अद्ययावत करत काम केले असून प्रत्येक टप्प्यात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि परिणामकारक प्रशासनाच्या बळावर कृषी विभागाला नव्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे, त्यामुळे त्यांच्या सेवा काळात त्यांनी केवळ बदलत्या कृषी व्यवस्थेचा साक्षीदार म्हणून नव्हे, तर त्या परिवर्तनामध्ये मोलाचे योगदान देणारा आणि आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण केली आहे.

 विशेष म्हणजे कृषी विभागाच्या मालमत्तांचे ई-मॅपिंग करून राज्यभरातील शासकीय तसेच भाडेतत्त्वावरील कार्यालयांची माहिती एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार श्री. रफिक नाईकवाडी यांनी घेतला, या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध स्वच्छतागृहांपासून ते इतर मूलभूत सुविधांची माहिती, तसेच शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सेवांची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ लागली. विभागाच्या मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि सेवा व्यवस्थेचे डिजिटल दस्तावेजीकरण करून कृषी प्रशासन अधिक पारदर्शक, सुसूत्र, कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमामुळे कृषी विभागाच्या डिजिटल परिवर्तनाला नवी दिशा मिळाली असून, भविष्यातील प्रशासनासाठी हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे.

नाईकवाडी यांच्या कामाच्या केंद्रस्थानी शेतकरीच असल्याचे वेळोवेळी जाणवते, वेळेचे कोणतेही बंधन न पाळता, रात्री-अपरात्रीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची कार्यशैली अनेकांनी अनुभवली आहे. त्या अनुभवाचा साक्षीदार मी स्वतःही आहे. एकदा माझ्या परिचयातील एका शेतकऱ्याचा फोन आला. त्याला प्रथमच कृषी माल निर्यात करायचा होता. निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या; मात्र फायटो सानिटरी प्रमाणपत्र नसल्यामुळे त्याची निर्यात अडचणीत आली होती. विलंब झाल्यास त्याचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता होती, त्यावेळी मी त्याला रफिक नाईकवाडी यांचा दूरध्वनी क्रमांक दिला, तेंव्हा ते विभागीय सहसंचालक पुणे येथे कार्यरत होते,  रात्री उशिराची वेळ असूनही त्यांनी शेतकऱ्याचा फोन तितक्याच आत्मीयतेने स्वीकारला, परिस्थितीची गंभीरता ओळखली आणि तत्काळ आवश्यक यंत्रणा कार्यान्वित केली, त्या क्षेत्रातील संबंधित महिला कर्मचाऱ्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घेत फायटो क्लिअरन्स प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून दिले.

विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिला कर्मचारी सुरक्षितपणे घरी पोहोचली का, याची त्यांनी सातत्याने विचारपूस केली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तिच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक करत अभिनंदनपर संदेशही पाठविला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत; ज्या शेतकऱ्यासाठी ही संपूर्ण धडपड करण्यात आली, त्या शेतकऱ्याशीही त्यांनी संपर्क साधून निर्यातीची प्रक्रिया सुरळीत पार पडली का, माल वेळेत रवाना झाला का आणि त्याला कोणतीही अडचण आली नाही ना, याची आत्मीयतेने चौकशी केली. कर्मचारी आणि शेतकरी या दोघांविषयीही समान संवेदनशीलता, जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यनिष्ठा जपणारी ही कार्यपद्धतीच श्री. रफिक नाईकवाडी यांच्या लोकाभिमुख, माणुसकी जपणाऱ्या आणि परिणामकेंद्री प्रशासकीय नेतृत्वाची खरी ओळख ठरते.

शेतकरी सेवा, शेती शाळा आणि विविध कृषी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि ऑनलाइन करण्यासाठी श्री. रफिक नाईकवाडी यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळात सातत्याने पाठपुरावा केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कृषी प्रशासनाला डिजिटल युगाशी सुसंगत बनविणे आणि शेतकरी-केंद्रित सेवा वितरण व्यवस्था उभारणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा ध्यास होता. शैक्षणिक अभ्यास, प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाचा समृद्ध अनुभव यांचा उत्कृष्ट संगम त्यांच्या कार्यपद्धतीत सातत्याने दिसून आला. त्यामुळेच ते केवळ एक सक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर कृषी क्षेत्रातील अभ्यासू, संवेदनशील, दूरदृष्टीचे आणि परिवर्तनवादी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

सत्यउपासक वृत्तसंस्था त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि लोकाभिमुख सेवेला मनःपूर्वक अभिवादन करते. त्यांच्या कार्याचा ठसा केवळ शासनाच्या नोंदींमध्येच नव्हे, तर लाखो शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या मनात कायम राहील, याबद्दल शंका नाही.

शासकीय सेवेतून सेवानिवृत्ती हा केवळ एका पदाचा शेवट असतो; परंतु कर्तृत्व, विचार आणि समाजासाठी केलेल्या कार्याचा प्रवास कधीच संपत नाही. श्री. रफिक नाईकवाडी यांनी आपल्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू आणि लोकाभिमुख कार्यातून कृषी विभागावर तसेच असंख्य शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटविला आहे. त्यांच्या सेवेतून निर्माण झालेल्या कार्यसंस्कृतीची प्रेरणा आगामी पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे ज्ञान, अनुभव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी तितकीच उपयुक्त ठरेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत सत्यउपासक वृत्त समूह त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय शासकीय सेवेला मानाचा मुजरा करीत श्री. रफिक नाईकवाडी यांना निरोगी, आनंदी, दीर्घायुषी आणि समाजोपयोगी पुढील जीवनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!