Ganeshotsav 2026 Register & Participate

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे!

अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य विजेत्यांना साडेसात लाखांपर्यंत पारितोषिक!!

सत्यउपासक वृत्त/ पुणे: यावर्षीचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक परंपरांचे जतन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, राज्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने केले आहे.

या स्पर्धेसाठी धर्मादाय आयुक्त, स्थानिक पोलीस अथवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची आवश्यक परवानगी घेतलेली नोंदणीकृत किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पात्र ठरणार आहेत. पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या मंडळांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने अर्ज करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन अर्ज केलेल्या मंडळांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येणार आहे. या समितीमार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट एका गणेशोत्सव मंडळाची निवड करून त्याची शिफारस राज्यस्तरीय समितीकडे केली जाणार आहे. त्यामुळे केवळ भव्य सजावट किंवा देखाव्यापुरता उत्सव मर्यादित न ठेवता सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सवाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मंडळांना या स्पर्धेत आपले कार्य प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे.

राज्यस्तरीय विजेत्यांना लाखोंची बक्षिसे!

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मंडळाला ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड होणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या मंडळांनाही पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकाला ५० हजार, द्वितीय क्रमांकाला ४० हजार आणि तृतीय क्रमांकाला ३० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे निकष महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय क्र. पुलदे २०२५/प्र.क्र.११५ (१२६४४६७)/सां.का.२, दि. १७ ऑगस्ट २०२६ मध्ये निश्चित करण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, लोकजागृती, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि समाजहिताच्या उपक्रमांचे प्रभावी व्यासपीठ ठरावे, या व्यापक उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना राज्यस्तरावर पोहोचविण्यासाठी ११ सप्टेंबरची अंतिम मुदत लक्षात घेऊन मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!