गुळाची वाहतूक-साठवणुकीत खबरदारी घ्या; गुणवत्ता व खाद्यसुरक्षेशी तडजोड नको!
पुणे जॅग्गेरी मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटीया यांचे व्यापारी, अडते व वाहतूकदारांना आवाहन!!
सत्यउपासक वृत्त/पुणे: गुळाची गुणवत्ता आणि खाद्यसुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी त्याची वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक करताना स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. गुळ हा थेट अन्नपदार्थ असल्याने वाहतुकीपासून गोदामापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर निष्काळजीपणा झाल्यास त्याच्या गुणवत्तेवर तसेच ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व गुळ व्यापारी, अडते आणि वाहतूकदारांनी वाहनांची स्वच्छता, सुरक्षित हाताळणी आणि योग्य साठवणुकीबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे जॅग्गेरी मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटीया यांनी केले आहे.
गुळाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन स्वच्छ, कोरडे आणि कोणत्याही प्रकारच्या दुर्गंधीपासून मुक्त असावे. गुळाचे रवे किंवा गुळाचे बॉक्स यांच्यावर अन्य कोणताही माल ठेवू नये. विशेषतः रसायने, खते, कीटकनाशके अथवा गुळ दूषित होण्याची शक्यता असलेल्या वस्तूंसोबत गुळाची वाहतूक करणे टाळावे. गुळाला इतर वस्तूंचा वास, धूळ किंवा रासायनिक घटकांचा संपर्क येणार नाही, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
साठवणुकीच्या ठिकाणीही गुळाची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. गुळ स्वच्छ, कोरड्या आणि हवेशीर जागेत ठेवावा. पाणी, ओलावा, थेट सूर्यप्रकाश आणि अतिरिक्त उष्णतेपासून गुळाचे संरक्षण करावे. गुळाच्या रव्यांवर किंवा बॉक्सवर धान्य, अन्नधान्य अथवा अन्य कोणताही माल ठेवू नये. गुळाच्या शेजारी ठेवलेल्या इतर मालामुळे धूळ, वास, ओलावा किंवा अन्य दूषित घटकांचा परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.
गुळाची थप्पी रचतानाही सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे असून थप्पी शक्यतो चार फुटांपेक्षा अधिक उंच ठेवू नये. अनावश्यक वजन किंवा दबाव गुळावर पडल्यास त्याच्या स्वरूपावर आणि गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मालाची रचना करताना सुरक्षित अंतर, योग्य उंची आणि पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मालाच्या व्यवस्थापनासाठी ‘प्रथम आलेला माल प्रथम बाहेर’ (First In–First Out – FIFO) हे तत्त्व कटाक्षाने पाळावे. गोदामात सर्वप्रथम आलेला जुना गुळ प्रथम विक्री किंवा वितरणासाठी काढावा आणि नवीन माल जुन्या मालामध्ये मिसळून ठेवणे टाळावे. यामुळे जुना माल दीर्घकाळ साठून राहण्याची शक्यता कमी होऊन गुणवत्तेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल.
यासोबतच उत्पादकाकडून गुळ प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मूळ स्वरूपात, शुद्धतेत आणि गुणवत्तेत कोणताही बदल करू नये. गुळामध्ये कोणत्याही पदार्थाची भेसळ, अनधिकृत भर किंवा प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करू नये. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड टाळणे ही व्यापारी आणि संबंधित सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे.
गुळाची योग्य वाहतूक, सुरक्षित हाताळणी आणि शास्त्रीय पद्धतीने साठवणूक केल्यास त्याची गुणवत्ता, शुद्धता आणि खाद्यसुरक्षा दीर्घकाळ टिकवून ठेवता येते. त्यामुळे व्यापारी, अडते, वाहतूकदार आणि गोदामचालकांनी केवळ मालाचे आर्थिक मूल्य न पाहता तो थेट ग्राहकांच्या अन्नाचा भाग आहे, ही जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावर आवश्यक खबरदारी घ्यावी, असे अजित सेटीया यांनी स्पष्ट केले.