ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व पशुपालकांसाठी मोठी संधी – पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

पुणे, दि. ३ मे: ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक २ मे २०२५ ते १ जून २०२५ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहे.

पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात येते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आली असून, ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ आहे.

प्रमुख योजनांचा आढावा: दुधाळ गाई/म्हशी गट वाटप योजना, शेळी-मेंढी गट वाटप योजना, १००० मांसल कुक्कुट संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप, २५ कोंबड्यांच्या तलंगा गट वाटप योजनाया योजनांमध्ये इच्छुक लाभार्थींना AH-MAHABMS मोबाईल ॲप किंवा https://ah.mahabms.com या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रियेबाबतची सर्व माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे.

पशुपालकांना आवडीनुसार डेअरी, पोल्ट्री, शेळीपालन यामधून निवड करता येणार आहे. अर्ज सुलभ असून, बहुतांश माहिती पर्याय निवडून भरता येणार आहे. अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज स्थितीचे अपडेट्स एसएमएसद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे अर्ज करताना मोबाईल क्रमांक अचूक व कायम ठेवावा. विशेष बाब म्हणजे, २०२१-२२ पासून अर्जदारांची प्रतिक्षा यादी पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एकदा अर्ज केल्यानंतर वारंवार अर्ज करण्याची आवश्यकता नाही. लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यानुसार योजना लाभाचा अंदाज बांधता येणार आहे.

अर्जासंदर्भातील मदतीसाठी संपर्क: टोल फ्री क्रमांक: १९६२ (सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायं. ६) नजीकचे पशुवैद्यकीय दवाखाने, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपआयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!