
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी मेजवानी!
सातारा: महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या कालावधीत तब्बल २० ते २२ वर्षांनंतर तीन दिवसीय महापर्यटन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेशकर, टोल व वाहनतळ शुल्क माफ करण्यात आले असून, प्रत्येक पर्यटकाला एक स्वागत किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये माहितीपत्रक आणि उपयुक्त वस्तूंचा समावेश असेल.
उत्सवाच्या पहाटे योग सत्र, बासरी व सतार वादन, सायंकाळी शहरात कार्निव्हल परेड, वेण्णा लेक येथे तरंगता बाजार, लेझर शो, ड्रोन शो, आणि विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. तापोळा येथे जलक्रीडा व भोसे येथे साहसी खेळ, हेलिकॉप्टर राईड व पॅराग्लायडिंग यांचा आनंद घेता येणार आहे. माखरिया हायस्कूलमध्ये फूड फेस्टिव्हल अंतर्गत महाराष्ट्रातील खास खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील.
गोल्फ मैदानावर मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पंचतारांकित टेन्ट सिटी उभारण्यात आली आहे. यावेळी उत्तम योगदान देणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
महापर्यटन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल:
उत्सवामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २ ते ४ मे दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
★ वाई-पाचगणी-महाबळेश्वरकडे येणारी वाहतूक पसरणी घाटमार्गे एकेरी पद्धतीने चालवण्यात येईल.
★ महाबळेश्वरवरून पुणे-वाईकडे जाणारी वाहतूक मेढा-कुडाळ-पाचवडमार्गे वळवण्यात आली आहे.
★ भिलार-पाचगणीकडे जाणारी वाहतूक उदय हॉटेल चौक-आर. आर. कॉटेज चौक मार्गे एकेरी पद्धतीने जाईल.
★ वेण्णा लेककडे जाणारी वाहतूक महाबळेश्वर मार्केट-नाकिंदा फाटा मार्गे वळवली आहे.
★ सातारा-सांगलीकडे जाणारी वाहने मेढा-सातारामार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गाने जाऊ शकतील.
वाहतुकीच्या बदलाबाबत आवश्यक ते फलक लावण्यात आले असून, पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर पर्यटन नकाशावर पुन्हा एकदा झळकणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा चांगला फायदा होणार आहे.