माढा तहसीलदार विनोद रणवरे यांचे निलंबन; अवैध वाळू उत्खनन व प्रशासकीय अनियमिततेमुळे कारवाई…
सोलापूर, दि. २८ एप्रिल : माढा तालुक्यातील अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवता कामकाजात निष्काळजीपणा केल्यामुळे माढा तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून, ही कारवाई महसूल व वन विभागाच्या २३ एप्रिल २०२५ च्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
माढा तालुक्यातील उजनी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपशाचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ फेब्रुवारी रोजी विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव पाठवला होता. चौकशीत रणवरे यांनी कार्यालय प्रमुख म्हणून विहित मुदतीत अपेक्षित कारवाई न केल्याचे निष्पन्न झाले.
तपासणीत रणवरे यांनी मागणी केलेला खाणपट्ट्यांचा अहवाल वेळेत सादर न करणे, तपासणीत निदर्शनास आलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करणे आणि सुधारणा न करणे आदी गंभीर अनियमितता केल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, “माढा तहसीलदार विनोद रणवरे यांच्याविरुद्ध निलंबनाची शिफारस तीन महिन्यांपूर्वीच शासनाकडे करण्यात आली होती. शासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यातही अवैध वाळू उपशावर नियंत्रण न ठेवणाऱ्या व कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल.
“सूत्रांच्या माहितीनुसार, यापुढील काळात माढा तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात येण्याची शक्यता आहे.