वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन
भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी जीडीपीचा कणा ठरेल – नरेंद्र मोदी
मुंबई, दि. 1 : भारताची ऑरेंज इकॉनॉमी कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे विकासाचे तीन नवे स्तंभ असून, येत्या काही वर्षांत भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट 2025’ (WAVES 2025) च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हेव्ज 2025 चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, एस. जयशंकर, डॉ. एल. मुरुगन यांच्यासह अनेक देशी-विदेशी मान्यवर उपस्थित होते.
अॅनिमेशन मार्केटमध्ये भारताची संधी, पंतप्रधानांनी सांगितले की, जागतिक अॅनिमेशन मार्केट सध्या 430 अब्ज डॉलरचा असून पुढील दहा वर्षांत ते दुप्पट होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताच्या अॅनिमेशन व ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी ‘व्हेव्ज’ हे व्यासपीठ यशाचे नवे दार खुले करत आहे.
कला, संगीत, नृत्य हेही विकासाचे घटक
“आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक संवेदनशील आणि समृद्ध बनवायचे आहे. त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना महत्त्व देणे गरजेचे आहे,” असे सांगून मोदींनी भारताच्या कथा, संकल्पना आणि सर्जनशीलतेचा जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र सर्जनशील क्रांतीच्या अग्रस्थानी — मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हेव्ज परिषदेला सर्जनशील चळवळ असे संबोधून सांगितले की, “मुंबईतील ५०० एकर चित्रपट नगरीपैकी १२० एकर क्षेत्रात माध्यम व करमणूक शहर साकारण्यात येणार आहे. हे केंद्र अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग यावर केंद्रित असेल.”
आयआयसीटी मुंबईत साकारणार — अश्विनी वैष्णव
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की, 400 कोटींच्या निधीतून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून यासाठी Google, Apple, Microsoft, Adobe सारख्या कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे.
सेलिब्रिटींचा उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमात अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावना सादर केली. एम.एम. किरणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. राजामौली, हेमामालिनी, रजनीकांत, रणबीर कपूर, आमिर खान, मुकेश अंबानी, शांतनु नारायण यांच्यासह अनेक दिग्गजांनी मंचावरून मनोगत व्यक्त केले.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना मानवंदना
या वेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.