अफवांमुळे पंपांवर ताण; ‘फक्त आवश्यकतेपुरतेच इंधन घ्या’ – प्रशासनाचे आवाहन
इंधनासाठी झुंबड टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; मर्यादित विक्री लागू
सत्यउपासक/ दि.२५: राज्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत अधिकारांचा वापर करून तातडीने काही निर्बंध लागू केले आहेत.
या आदेशानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक बाटल्या, कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून इंधन केवळ वाहनाच्या टाकीतच भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या नियमांनुसार पेट्रोल व डिझेलची केवळ रिटेल विक्री करण्यास परवानगी असून बल्क विक्री किंवा लूज सेल पूर्णपणे बंद आहे. PESO मान्यता नसलेल्या कंटेनरमध्ये इंधन देणे नियमबाह्य असल्याने सर्व पेट्रोल पंप व्यवस्थापकांना याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरमार्फत याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्या उपलब्ध साठ्याची, प्राप्त साठ्याची व मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. हे निर्बंध 25 मार्च 2026 पासून लागू असून 31 मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहेत.
सत्यउपासक वृत्त समूहाकडून पेट्रोल पंप धारकांशी संपर्क साधला असता तुटवडा नसल्याचे मान्य केले असले तरी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल पंपांसाठीची क्रेडिट सुविधा अचानक बंद केल्यामुळे काही इंधन व्यवसायीकांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले असून पूर्वी ३० ते ५० लाख रुपयांपर्यंत पेट्रोल डिझेल खरेदी करिता क्रेडिट मिळत असल्याने पंप धारकांना पुरवठा साखळी सुरळीत ठेवता येत होती, मात्र आता पूर्वीची थकीत क्रेडिट रक्कम पूर्ण जमा केल्यानंतरच पुढील इंधन मागणीसाठी रोख रक्कम जमा करण्याचे निर्बंध ऑईल कंपन्यांनी घातल्याने त्यांचा रोकड प्रवाह मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. त्यातच ट्रान्सपोर्ट कंपन्या, दूध डेअऱ्या आणि बांधकाम क्षेत्रातील वाहनांना दिलेल्या उधारीची वेळेवर वसुली होत नसल्याने आर्थिक ताण अधिक वाढला आहे. परिणामी काही पेट्रोल पंप धारक आर्थिक अडचणीत सापडले असून त्याचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होत असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे व पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.