पडद्यामागे मरत चाललेली कला; सर्कशीतील हसरे चेहरे आज उपासमारीच्या छायेत!
सत्यउपासक विशेष लेख:
मागील महिन्यात एका मैदानात सर्कस आल्याचे दिसून आले आणि मनाशी ठरवले की मुलाला सर्कस दाखवावी; पण त्याचे पेपर सुरू असल्याने थांबलो, जेमतेम आठवड्यानंतरच पेपर संपताच उत्साहाने तिकीट काढण्यासाठी गेलो, तर तिकीट खरेदी करण्याकरिता एकही व्यक्ती दिसली नाही आणि तिकीट खिडकीत सुद्धा कोणीच नव्हते! आसपास काही कलावंत दिसले त्यांच्याकडे चौकशी केली असता हवे तेवढे प्रेक्षक न आल्याने शो रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले, तसेच गेल्या आठवड्यात केवळ दोनच शो झाल्याचेही त्यांच्याकडून कळाले कधीकाळी सहा-सहा महिने एका ठिकाणी गजबजून राहणारे तंबू आज ओस पडलेले दिसत होते; जागेचे भाडेही न निघाल्याने सर्कशीची चूल विझल्यासारखी दयनीय अवस्था पाहून डोळे नकळत ओलसर झाले. शो कॅन्सल झाला असला तरी मदत म्हणून तिकिटाचे पैसे देऊ केले, पण त्या कलावंतांनी तेही नम्रपणे नाकारले! कलेचा स्वाभिमान अजूनही जिवंत असल्याची ती वेदनादायी जाणीव होती. त्यानंतर काही कलाकारांनी आपली व्यथा मांडली रिल्स, सोशल मीडिया आणि कृत्रिम मनोरंजनाच्या लाटेत जिवंत कलेला प्रेक्षकच उरले नाहीत, आणि आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आली असल्याचे बहुतेक जणांच्या बोलण्यातून जाणवले, त्या तंबूतून बाहेर पडताना मनात एकच प्रश्न घुमत राहिला अशीच उपेक्षा सुरू राहिली तर ही कला काही दिवसांत कायमची लुप्त होणार का?
कधीकाळी गावोगावी उभारली जाणारी सर्कस म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर ती आश्चर्य, कौतुक आणि जिवंत कलेचा महोत्सव असायची. रंगीबेरंगी तंबूतून उमटणारा ढोल-ताशांचा आवाज, हवेत झेपावणारे कलाकार, जीव धोक्यात घालून केले जाणारे साहसी खेळ, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा जोकर ही केवळ दृश्ये नव्हती, तर ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग होती. पण आज, हाच तंबू शांत झाला असून हसणारे चेहरे आता अश्रूंनी भिजलेले दिसत आहेत, यात सर्वात वेदनादायक म्हणजे जे लोक इतरांना आनंद देत होते, तेच आज स्वतः उपासमारीच्या दारात उभे आहेत.
सोशल मीडिया, रिल्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झगमगाटात आपण इतके गुरफटलो आहोत की, खऱ्या कलेची किंमत आपण विसरत चाललो आहोत. मोबाईलच्या पडद्यावर काही सेकंदांत मिळणाऱ्या मनोरंजनाने आपल्या मनावर इतकी पकड घेतली आहे की, दोन तासांच्या जिवंत सादरीकरणाकडे पाहण्याची आपली तयारीच उरलेली नाही. परिणामी, सर्कशीतील कलाकार, डोंबारी, साहसी खेळ करणारे, आणि इतर पारंपरिक कलावंत ज्यांचे पोट हे केवळ त्यांच्या कलेवर अवलंबून आहे; ते आज अक्षरशः उपासमारीशी झुंज देत आहेत.
सर्कस केवळ व्यवसाय नसून अनेक कलावंताच्या कुटुंबांची जीवनरेखा आहे; एका सर्कशीत शेकडो कलाकार, कामगार, संगीतकार आणि प्राणी यांचा उदरनिर्वाह चालत असून प्रत्येक खेळामागे वर्षानुवर्षांची साधना, कठोर परिश्रम आणि जीव धोक्यात घालण्याची सुद्धा तयारी असते पण आज त्या कलेला ना प्रेक्षक आहेत, ना पाठबळ यामुळे सर्कशीचा पडदा शो शिवायच पडतोय! याव्यतिरिक्त सरकारच्या धोरणांमध्ये या कलावंतांसाठी ठोस योजना दिसत नसून समाजानेही त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने कलावंतांच्या पोटावर लाथ मारल्याचेच भयान वास्तव समोर येते.
आजचा प्रश्न केवळ सर्कशीचा नाही, तर आपल्या सांस्कृतिक असंवेदनशीलतेचा आहे. आपण आपल्या मुलांना काय दाखवत आहोत? मोबाईलवरचे कृत्रिम मनोरंजन, की जिवंत कलेचा खरा अनुभव? जर आपण आज या कलावंतांकडे दुर्लक्ष केले, तर उद्या आपल्या पुढील पिढीला ‘सर्कस’ ही केवळ इतिहासातील एक गोष्ट म्हणून वाचावी लागेल.
आज जनसामान्यांचे जीवन हळूहळू कृत्रिमतेच्या कवचात अडकत चालले आहे, यामध्ये हसू कृत्रिम, भावना कृत्रिम आणि मनोरंजन तर पूर्णपणे कृत्रिम झालं आहे. मोबाईलच्या पडद्यावर दिसणारं हसू खऱ्या आनंदाचं नसतं, तर ते काही सेकंदांसाठी तयार केलेलं आभासी समाधान असतं! या डिजिटल जगात आपण इतके गुंतलो आहोत की, जिवंत कलेचा स्पर्श, कलाकारांच्या घामाची किंमत आणि त्यांच्या कलेतील प्रामाणिकपणा आपण विसरत चाललो आहोत. सर्कस, डोंबारी, साहसी खेळ हे केवळ मनोरंजनाचे प्रकार नाहीत, तर ती आपल्या संस्कृतीची जिवंत ओळख आहे; पण आज तीच ओळख लोकांपासून दूर जात आहे. जे कलाकार आपल्या कलेतून आपल्याला खऱ्या अर्थाने हसवतात, थक्क करतात, त्यांच्याकडे मात्र समाजाने पाठ फिरवली असून कृत्रिमतेच्या या झगमगाटात आपण इतके हरवून गेलो आहोत की, जिवंत कलेचा आत्माच हरवण्याच्या मार्गावर असून प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण खऱ्या भावनांना, खऱ्या कलेला वाचवणार आहोत की तीही या कृत्रिम जगात कायमची हरवू देणार आहोत?
ही वेळ केवळ सहानुभूती व्यक्त करण्याची नाही, तर कृतीची असून जेव्हा सर्कशीतील जोकर आपले शेवटचे हसू गमावेल तेव्हा समाजसुद्धा आपला खराखुरा आनंद हरवेल! हे विसरून चालणार नाही याकरिता सरकारने या पारंपरिक कलावंतांसाठी विशेष योजना राबवायला हव्यात, आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि आधुनिक माध्यमांशी जोडण्याची संधी द्यायला हवी, तसेच समाजानेही आपल्या कलेच्या मुळांकडे परत पाहिले पाहिजे. सर्कस बघायला जाणे, या कलाकारांना प्रोत्साहन देणे, आणि त्यांच्या कलेचा सन्मान करणे हीच खरी मदत ठरू शकते!
( ए आय फोटो ) जेव्हा सर्कशीतील जोकर आपले शेवटचे हसू गमावेल तेव्हा समाजसुद्धा आपला खराखुरा आनंद हरवेल!