Konkan Hapus Faces Bogus Pesticides

बोगस औषधांचा फटका की हवामान बदल?; कोकणातील हापूस उत्पादन घटीमागील खरे कारण काय?

मोहोर भरघोस, तरीही फळधारणा अपयशी; बागायतदारांमध्ये संताप!

रत्नागिरी:  हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामान बदलामुळेच हापूस उत्पादन घटल्याचा दावा सरकारी यंत्रणा आणि काही अहवालांमधून केला जात असला, तरी स्थानिक बागायतदार मात्र यामागे बोगस औषधांचाही मोठा हात असल्याचा गंभीर आरोप करत आहेत.

सरकारी अहवाल आणि स्थानिक बागायतदारांच्या माहितीनुसार, यावर्षी रत्नागिरी, चिपळूण परिसरातील केवळ १० ते २० टक्केच आंबा बाजारपेठेत पोहोचत आहे. सुमारे ९० टक्के मोहोर गळून पडल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, हंगामाच्या सुरुवातीला आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे यावर्षी विक्रमी उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र मोहोर टिकून राहावा आणि चांगली फळधारणा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी केली. त्यानंतरही अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यामुळे काही औषध कंपन्या आणि बाजारात विक्री होणारी बोगस औषधे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

बागायतदारांच्या म्हणण्यानुसार, बाजारात बोगस औषधांची खुलेआम विक्री सुरू असून त्यावर कोणतेही प्रभावी नियंत्रण नाही. कोणते औषध दर्जेदार आणि कोणते बनावट, याबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जनजागृतीही नाही. शेतकरी आंब्यावर फवारणीसाठी औषधे घेण्यासाठी दुकानात जातात. त्यावेळी दुकानदारांकडून कोणत्या महिन्यात कोणती फवारणी करावी, किती प्रमाणात करावी याची माहिती दिली जाते आणि उपलब्ध औषधे विकली जातात. मात्र ती औषधे खरोखर प्रभावी आहेत की बोगस, याची खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा शेतकऱ्यांकडे नसल्याचे वास्तव आहे.

स्थानिक बागायतदारांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला मोहोर चांगला असताना नंतर अचानक मोठ्या प्रमाणात गळ होणे केवळ हवामान बदलामुळे झाले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. हवामानाचा परिणाम असला तरी काही औषध कंपन्या आणि निकृष्ट दर्जाच्या फवारणी औषधांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, यावर्षी कर्नाटक, मद्रास तसेच इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणात आंबा जिल्ह्यात दाखल झाल्याने बाजारात आंब्याची कमतरता जाणवत नसल्याचे चित्र आहे. मात्र परराज्यातील आंबा कोकणच्या हापूसच्या नावाने विकला जात असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विक्रेते परराज्यातील आंब्याला देवगड-रत्नागिरी नाव असलेल्या बॉक्समध्ये पॅक करत असून, मराठी वृत्तपत्रांची रद्दी वापरून तो कोकणातील हापूस असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.

ग्राहकांना अस्सल हापूसची योग्य ओळख नसल्यामुळे आर्थिक फसवणूक होत आहे. परराज्यातील आंब्याला कोकणच्या हापूससारखी चव नसल्याने ग्राहकांमध्ये कोकणच्या हापूसबाबत चुकीचा समज निर्माण होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

अस्सल हापूस ओळखण्यासाठी शासनाने जीआय मानांकन आणि क्यूआर कोड प्रणाली लागू केली असली, तरी ती अद्याप सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलेली नाही. मोजकेच जागरूक ग्राहक या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने भेसळ रोखण्यात ही यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे.

या प्रकारामुळे कोकणच्या हापूसचा ब्रँड बदनाम होत असून शासनाने राज्याच्या सीमांवर परराज्यातून येणाऱ्या आंब्याची कडक तपासणी करावी, तसेच भेसळयुक्त आंबा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक बागायतदार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बागायतदार वर्षभर आंबा बागांची देखभाल करत लाखो रुपयांचा खर्च करतात. त्यामुळे हंगामात चांगले उत्पादन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र नफ्याच्या मोहापोटी काही विक्रेते बोगस औषधांची विक्री करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला जात आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत पुरेशी माहिती नसल्याने शेतकरी दुकानदारांवर विश्वास ठेवून औषधे खरेदी करतात आणि त्याचाच फटका त्यांना बसत असल्याची भावना आता बागायतदारांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!