स्पर्धेच्या युगात दहावीनंतर करिअरसाठी सक्षम पर्याय!
सत्यउपासक विशेष: राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत मोठे बदल घडत आहेत. एकेकाळी अकरावी-बारावी आणि महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे मुख्य केंद्र मानले जात होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. अनेक महाविद्यालयांच्या वर्गखोल्या रिकाम्या दिसत असताना कोचिंग क्लासेस मात्र विद्यार्थ्यांनी फुलून गेलेले दिसतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांमुळे शिक्षण व्यवस्थेचे केंद्रबिंदू शाळा आणि महाविद्यालयांऐवजी शिक्षणाचे व्यावसायिकरण झाल्यामुळे कोचिंग क्लासेस कडे कल वाढला आहे.
आज एमएच-सीईटी आणि जेईईसारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांभोवती मोठे व्यावसायिक जाळे उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांचे वर्ग ओस पडत असताना कोचिंग क्लासेस मात्र विद्यार्थ्यांनी गजबजलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला आयआयटी, एनआयटी आणि नामांकित अभियांत्रिकी संस्थांची स्वप्ने दाखवत प्रवेश परीक्षांच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची शिक्षण बाजारपेठ निर्माण झाली असून ज्ञानापेक्षा गुण आणि गुणवत्तेपेक्षा रँक यांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने शिक्षणाचे केंद्र महाविद्यालयांमधून कोचिंग क्लासेसकडे सरकले आहे. परिणामी अकरावी-बारावीचे शिक्षण अनेक ठिकाणी केवळ औपचारिकता बनले असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षण व्यवस्था यांच्याभोवती करिअरच्या नावाखाली एक प्रचंड व्यावसायिक उद्योग उभा राहिल्याचे वास्तव आहे.
आज अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांमध्ये अलिखित करार केले जात असून विद्यार्थी महाविद्यालयात केवळ नाव नोंदवतात, फी भरतात; मात्र प्रत्यक्ष शिक्षण कोचिंग क्लासेसमधून घेत आहेत, अशा परिस्थितीत अकरावी आणि बारावीचे शिक्षण अनेकदा केवळ औपचारिकता बनून राहते. महाविद्यालयातील प्रयोगशाळा, ग्रंथालये, सांस्कृतिक उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधींपासून विद्यार्थी दूर जातात. शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला पडून केवळ प्रवेश परीक्षांमधील गुण हेच अंतिम ध्येय बनले आहे.
यामध्ये आर्थिक बाजूही तितकीच गंभीर आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी दोन वर्षांच्या कोचिंगचा खर्च अनेक ठिकाणी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे. याशिवाय महाविद्यालयीन फी, प्रवास, निवास आणि इतर खर्च वेगळे असतात. सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही मोठी आर्थिक जबाबदारी ठरते. एवढा खर्च करूनही अपेक्षित शाखा किंवा महाविद्यालय मिळेल याची कोणतीही शाश्वती नसते. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली शिक्षणाचा प्रवास करतात हेच शिक्षणाचे वास्तव बनले आहे.
अशा परिस्थितीत दहावीनंतरचा अभियांत्रिकी पदविका अर्थात इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम हा एक व्यवहार्य, किफायतशीर आणि परिणामकारक पर्याय म्हणून पुढे येत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना थेट तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश देतो. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच त्यांच्या आवडीच्या शाखेत शिक्षण घेण्याची संधी मिळते. यामुळे त्यांची दिशा स्पष्ट होते आणि वेळेचा अपव्यय टाळला जातो.
आज कौशल्याधारित व्यवसायिक शिक्षण रोजगार आणि स्वंयरोजगाराच्या दृष्टीकोनातून गरजेचे बनले आहे. अशा वेळी इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सैंद्धांतिक आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान देण्याबाबतीत समतोल साधत असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात.
डिप्लोमा अभ्यासक्रम निवडल्यास विद्यार्थी थेट तांत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात प्रवेश करु शकतात. ताण मुक्त वातावरणात शिकणारा विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे प्रगती करतो. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमात म्हणजेच बी.ई किंवा बी. टेक मध्ये थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. या प्रक्रियेला ‘लेटरल एंट्री’ असे म्हटले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक वेगवान बनतो. ते थेट पुढील स्तरावर जाऊन शिक्षण सुरू करू शकतात.
डिप्लोमा शिक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत प्रात्यक्षिक अनुभवही मिळतो. प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि प्रकल्पांच्या (प्रोजेक्ट्स) माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची सवय लागते. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या पुढील टप्प्यात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना विषय समजणे अधिक सोपे जाते. त्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात आणि त्यांना अभ्यासात आत्मविश्वास वाटतो. अनेकदा डिप्लोमा केलेले विद्यार्थी पारंपरिक मार्गाने आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सक्षम दिसतात, कारण त्यांच्याकडे आधीच प्रॅक्टिकल अनुभव असतो. अनुभव हे ज्ञानाचे सर्वात मोठे शिक्षक आहे.
वेळेची बचत आणि तांत्रिक कौशल्यांची मजबूत पायाभरणी हे दोन्ही घटक करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आजच्या उद्योग क्षेत्राला केवळ सैद्धांतिक ज्ञानातच नव्हे, तर प्रत्यक्ष कामातही पारंगत असतील अशा विद्यार्थ्यांची गरज आहे. डिप्लोमा अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी अशा प्रकारे तयार होतात. दहावीनंतरच विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या तांत्रिक शाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट राहतो, ते त्याच क्षेत्रात कौशल्य विकसित करु शकतात. या प्रक्रियेमुळे त्यांच्या करिअरचा पाया अधिक मजबूत बनतो. आजच्या काळात जितक्या लवकर विद्यार्थी योग्य दिशा निवडतात, तितक्या लवकर ते यशाच्या दिशेने वाटचाल करु शकतात.
करिअरची सुरुवात जितकी स्पष्ट आणि ठोस असेल, तितका पुढील प्रवास अधिक सोपा आणि यशस्वी होतो. डिप्लोमा हा केवळ एक पर्याय नसून तो एक स्मार्ट निर्णय आहे, जो विद्यार्थ्यांना वेळेची बचत करुन देतो आणि त्यांना करिअरच्या दिशेने वेगाने पुढे नेतो. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रम हजारो विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग ठरत आहे. तांत्रिक ज्ञान, प्रॅक्टिकल अनुभव आणि पुढील शिक्षणासाठी थेट संधी या सर्व गोष्टींचा संगम या अभ्यासक्रमामध्ये दिसून येतो.
योग्य निर्णय हा यशाची पहिली पायरी असतो. दहावीनंतर योग्य मार्ग निवडल्यास करिअरचा प्रवास अधिक वेगवान आणि परिणामकारक बनतो. डिप्लोमा नंतर थेट इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश ही संधी विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने करिअरला गती देणारी ठरते.
महाविद्यालये ओस आणि क्लासेस हाऊसफुल अशी निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ शिक्षण क्षेत्रातील बदल नसून ती संपूर्ण व्यवस्थेसमोरील एक गंभीर प्रश्न आहे. अशा वेळी कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि वेळेची बचत करणारा डिप्लोमा अभ्यासक्रम अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रभावी पर्याय ठरू शकतो. करिअरच्या शर्यतीत केवळ धावण्यापेक्षा योग्य दिशेने धावणे अधिक महत्त्वाचे असते. दहावीनंतरचा योग्य निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी गती देऊ शकतो आणि त्या दृष्टीने डिप्लोमा हा नक्कीच विचार करण्यासारखा मार्ग आहे.