Revamping in agri University

२३ वर्षांनंतर कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतीबंध मंजूर; ३,७२३ पदांना मान्यता…

सत्यउपासक वृत्त/मुंबई: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण ३ हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर म्हणजे २००३ नंतर प्रथमच नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून, यामुळे कृषी विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, त्यामध्ये नियमित स्वरूपातील ३ हजार ६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३ हजार ७२३ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या चारही कृषी विद्यापीठांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधन कार्याला बळकटी मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १ हजार २१७, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ९१५, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ८९० आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५८९ नियमित पदांच्या आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

राज्यातील कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. सुधारित आकृतीबंधामुळे विद्यापीठांची कार्यक्षमता वाढण्यास, संशोधनाला चालना मिळण्यास, विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होण्यास तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले. दरम्यान, गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू असून त्यासंदर्भातील आदेश नंतर जारी करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!